करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)
करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील कोटलींग देवस्थान हे लाखो भाविकांचे जागृत श्रद्धास्थान आहे.जगातील शिवलिंगांपैकी १ कोटी वे शिवलिंग या ठिकाणी आहे असे मानले जाते, म्हणूनच या देवस्थानला ‘कोटलिंग’ असे नाव पडले आहे.करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ख्याती असून, कर्नाटक, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, मुंबई भागातूनही हजारो भाविक येथे दाखल होतात. रात्रभर चालणारा छबिना, पारंपरिक सोंग आणि खेळ यांचा जल्लोष हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. “देवस्थान जागृत असले तरी प्रशासन व लोकप्रतीनीधी झोपेत असल्याने “उजनीच्या पोटात असलेले पर्यटनाचे रत्न पुर्ण पणे दुर्लक्षित राहाले आहे. नशीबाने अनेक वर्षांच्या लढ्यानंतर येणाऱ्या भावकींना नवीन चकाचक खड्डे मुक्त हायवे सारखा डांबरी रस्ता उपलब्ध झाला आहे.

●श्रद्धा अफाट, सुविधा तोकड्या●
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असूनही मंदिर व परिसराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. भाविकांसाठी पुरेशा सुख-सुविधांचा अभाव जाणवतो. हजारो भाविक या परिसरात दोन ते तीन दिवस मुक्कामी असतात तसेच शेकडो खेळणी दुकानदार, मिठाई ची दुकाने यांची रेलचेल असते.शौचालय, भक्त निवास, निवारा शेड नसल्याने यात्रेच्या काळात तर मोठी गैरसोय होते.
‘अ’ वर्ग दर्जा मिळाल्यास पर्यटनाला चालना
या क्षेत्राचा ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश झाल्यास शासनाकडून मोठा निधी उपलब्ध होऊ शकतो. सुसज्ज भक्तनिवास, अन्नछत्र, वाहनतळ, स्वच्छतागृहे या सुविधा उभारता येतील. समोरच असलेल्या उजनी जलाशयात बोटींग व्यवस्था आणि बगीचा विकसित केल्यास देवस्थानसोबतच चिखलठाण एक मोठे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येऊ शकते.

●कुगाव-निंबाळकर वाड्यामुळे पर्यटन केंद्र शक्य●
चिखलठाणला लागूनच हनुमान जन्माची आख्यायिका असलेले कूर्मग्राम म्हणजेच कुगाव आहे. येथील प्राचीन हनुमान मंदिर आणि ‘सैराट’ चित्रपटाचे शूटींग झालेले निंबाळकर राजवाडा या बाबी पर्यटनाला पूरक आहेत. कोटलींग देवस्थान, कुगावचे हनुमान मंदिर आणि निंबाळकर वाडा असे एक धार्मिक-ऐतिहासिक पर्यटन केंद्र विकसित केल्यास संपूर्ण परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या या देवस्थानाला ‘अ’ वर्ग दर्जा देऊन सर्वांगीण विकास करावा, अशी मागणी कोटलींग भाविकांतून होत आहे.




