●करमाळा_चौफेर (✍🏻लिंगेश्वर गोमे)●
आदिनाथ कारखाना हा कायम सहकारी तत्वावर रहावा आणि सभासदांचे मालकी हक्क अबाधित रहावेत या आमदार नारायण आबा पाटील यांच्या भुमिकेस विरोधकांनी सुध्दा समर्थन द्यावे असे आवाहन पाटील गटाकडून प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले आहे.
याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की परवा आमदार नारायण आबा पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत आदिनाथ बाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आदिनाथ कारखाना हा कोणी विकत घेऊ पहात असेल तर त्यास आपला विरोध असल्याचे सांगून आमदार नारायण आबा पाटील यांनी आदिनाथ हा सभासदांच्या मालकी हक्काचा राहण्यासाठी आपण रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास तयार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
यामुळे आदिनाथ बाबतचे सर्वकाही चित्र स्पष्ट झाले आहे. आदिनाथ कारखाना उर्जित अवस्थेत आला पाहिजे यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांनी शासकीय स्तरावर तसेच न्यायालयीन पातळीवर आपले प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. शासनाकडे आदिनाथ साठी आर्थिक मदत मागितली असताना तालुक्यातीलच काही राजकीय विरोधकांनी यास आडकाठी घातली हे त्रिवार सत्य आहे. ही बाब गंभीर असली तरी राजकीय वर्चस्वाच्या लढाईत विरोधकांनी कदाचित ही भुमिका घेणे सहाजिकच आहे असे समजून पाटील गट व सभासदही थोडावेळ ही बाब बाजुला ठेवण्यास तयार आहेत. परंतु किमान लिलाव प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना तरी विरोधकांनी सभासदांच्या बाजुने उभे राहुन लिलाव प्रक्रियेस विरोध करत आमदार नारायण आबा पाटील यांच्या भुमिकेचे समर्थन केले पाहिजे.
आमदार नारायण आबा पाटील यांना राजकीय विरोध करत असताना आता जर लिलाव प्रक्रियेच्या बाजुने कोणी उभे असेल तर हा एकोणतीस हजार सभासदांच्या मालकी हक्कास केलेला विरोध आहे असेच समजले जाईल. बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचे स्वतंत्र असे अस्तित्व आहे. परंतु आमदार नारायण आबा पाटील यांच्या कडून विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे हे गुळवे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले लक्ष साध्य करु पहात आहेत. आदिनाथ कारखाना हा करमाळा तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या अस्मितेचे प्रतिक असल्याने ज्यांना या करमाळा तालूक्याचा अभिमान वाटतो व आपुलकी वाटते ते सर्वजण आदिनाथ बाबत राजकारण न करता सभासदांच्या मालकी हक्कासाठी केंव्हाही एकत्र येऊ शकतात.
आदिनाथ कारखान्याच्या न्यायालयीन लढाईतही खरा करमाळकर हा आदिनाथच्या बाजुनेच उभा राहील. तसेच लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून जर कोणी हा कारखाना विकत घेऊ पहात असेल तर सर्व सभासद व कामगार हे भक्कमपणे आमदार नारायण आबा पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास तळेकर यांनी बोलून दाखवला व विरोधकांनीही आदिनाथ बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केले.
