करमाळा_चौफेर
आदिनाथ-मकाई वाद तापलेला असतानाच आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी ‘विठ्ठल शुगर’चा बॉम्ब टाकून बागल गटाला कोंडीत पकडले आहे. “राजकीय विरोध असताना बागल-शिंदे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण कशी काय?” असा थेट सवाल करत तळेकरांनी ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ अशी विचारणा केली आहे.
म्हैसगाव येथील माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या खाजगी मालकीच्या श्री विठ्ठल कार्पोरेशन लि. या कारखान्याकडे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे 8 लाख 44 हजार 323 रुपये येणे बाकी असताना विठ्ठल कारखाना विकला गेला, तरी बागलप्रणीत आदिनाथच्या तत्कालीन चेअरमन धनंजय डोंगरे यांनी वसुली केली नाही असा खळबळजनक आरोप तळेकरांनी केला आहे.
तळेकरांनी तारीख व चेक क्रमांक व व्हाऊचर क्रमांक सह हा व्यवहार समोर आणला असून त्यांनी म्हटले आहे की, 3 डिसेंबर 2015 जर्नल व्हाउचर क्र. 590 चेक क्र. 012202 नुसार आदिनाथच्या चिखलठाण युनियन बँक खात्यातून विठ्ठल कारखान्यास 15 लाख रुपये दिले. 31 मार्च 2019 जर्नल व्हाउचर क्र. 1719 नुसार यातील 8 लाख 15 हजार 224 रुपये आदिनाथला परत मिळाले. 12 जानेवारी 2023 थकबाकी असतानाही पुन्हा जर्नल व्हाउचर क्र. 325 , चेक क्र. 007501 नुसार आदिनाथच्या डी.सी.सी. बँक खात्यातून 15 लाख 565 रुपये विठ्ठलला दिले, 31 मार्च 2023 :जर्नल व्हाउचर क्र. 757 नुसार यातील 13 लाख 40 हजार 518 रुपये परत आले. आजमितीस 31 मार्च 2026 अखेर 8 लाख 44 हजार 323 रुपये विठ्ठल कारखान्याकडे थकीत आहेत.असे तळेकर यांनी म्हटले आहे.
“सर्वात धक्कादायक म्हणजे आदिनाथची देणे बाकी असताना संजयमामा शिंदे यांनी स्वतःचा विठ्ठल कारखाना विकून आदिनाथची निवडणूक लढवली. पण तत्कालीन चेअरमन धनंजय डोंगरे मुग गिळून गप्प राहिले. त्यांनी येणे बाकी रक्कम मागितलीच नाही. असे अनेक थकबाकीचे आकडे येत्या काही दिवसांत बाहेर पडतील.”असे देखील तळेकर म्हणाले आहेत.
“आदिनाथ, मकाई, कमलाई व विठ्ठल या कारखान्यांच्या आपसातील आर्थिक व्यवहारात राजकीय लागेबांधे स्पष्टपणे दिसून येतात. अडचणीत असताना सर्वच जण एकमेकांना मदत करतात हे एक नवलच आहे. विशेष म्हणजे एक विक्रीत निघाला तर बाकीच्यांचे गळीत हंगामच नाहीत. बागल आणि शिंदे यांच्यातील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ हे सभासदांना कधी सांगितले गेले नाही” असा सवाल तळेकरांनी उपस्थित केला आहे.
तळेकरांनी फक्त व्यवहाराची आकडेवारी समोर आणली आहे व विठ्ठल कडे 8 लाख 44 हजार बाकी असल्याचे सांगीतले मात्र हा व्यवहार काशासाठी झाला हा सस्पेन्स ठेवला आहे. आदिनाथ चे चेअरमन यांनी खुलासा केल्यानंतरच हा उलगडा होऊ शकतो.
