करमाळा चौफेर (शंभू फरतडे ✍🏻)
हाळगाव ता. जामखेड जि. अहिल्या नगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयास करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून पाणी नेण्यासाठी सभापती राम शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळवल्याची चर्चा होती. हा निर्णय घेताना स्थानिक ग्रामपंचायत तसेच पाणी वाटप संस्था, व शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याने व मांगीसह तेरा गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने करमाळा तालुक्यातील मांगीसह लाभक्षेत्रातील गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
मांगी प्रकल्पातील पाणी हाळगावला देण्यास विरोध करण्यासाठी मांगी पाणी बचाव संघर्ष समिती स्थापन करून यास तीव्र विरोध सुरू झाला होता, घंटानाद, रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले होते. विशेष म्हणजे मांगी हे भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मीदिदी बागल यांचे जन्मगाव असल्याने व त्यांनी या विषयावर उघड भूमिका न घेतल्याने रश्मी बागल यांना देखील लक्ष्य केले जात होते.
अखेर रश्मीदिदी बागल यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन तालुक्याच्या वतीने निवेदन सादर केले, व या निवेदनात त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. यामध्ये मांगी तलावाच्या पाण्यावर करमाळा तालुक्यातील १३ गावांचा शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे अवलंबून आहे, उजनी प्रकल्पातील अतिरिक्त पाणी या तलावामार्फत करमाळ्याच्या दुष्काळी भागाला दिले जाते, तलावातील पाणी अन्यत्र वळविल्यास करमाळा तालुक्यावर मोठा अन्याय होईल या बाबी निदर्शनास आणून देताच विखे-पाटील यांनी या बाबत सविस्तर अहवाल घेऊन निर्णय घेऊ, तोपर्यंत या आदेशास स्थगिती देण्यात आल्याचे जाहीर केले. हा आदेश रद्द झाल्याने राम शिंदे यांच्या ड्रिम प्रोजेक्टला धक्का बसला आहे.
महाविद्यालयाची स्थापना आणि त्यासमोरील पाणी व पायाभूत सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रा. शिंदे यांनी सातत्याने शासनाकडे पुढाकार घेतला होता. हाळगाव कृषी महाविद्यालय अवर्षण प्रवण क्षेत्रात असल्याने तिथे पिण्याचे पाणी आणि पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी पाण्याची मोठी टंचाई होती. यावर उपाय म्हणून प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून तब्बल २६.९१ कोटी रुपयांची उपसा जलसिंचन योजना राबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
●विखेना शह देण्याचा प्रयत्न●
विखे-पाटील हे सहकार व शिक्षणक्षेत्रात एक मात्तबर नेते म्हणून ओळखले जातात. विखे-पाटील यांच्या शैक्षणिक संस्था यांचे जाळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात पसरले असुन अहिल्यानगर ही सहकार व शिक्षणाचे मुख्य केंद्रस्थान बनले आहे. अशातच उच्चशिक्षित प्रा राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदार संघात कृषी महाविद्यालय उभे करुन एक प्रकारे विखे-पाटील यांना तगडे आव्हान निर्माण करण्यास सुरुवात केली असल्याने विखे-पाटील हे सुद्धा सहजासहजी या जिल्ह्यावरील आपली पकड ढिली होऊ देणार नाहीत. आणि याचाच फायदा रश्मी बागल यांनी उचलून कुटनीतीचा एक चांगला दाखला सर्वांना दिला आहे
●स्व मामांच्या कार्यपद्धतीची आठवण●
स्व दिगंबरराव बागल मामा हे अपक्ष आमदार असून देखील त्यांनी तालुक्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून घेतला, दहिगाव योजनेस मंजुरी मिळवली होती आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सत्तेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील अनेक योजना, रस्ते यांना विकास निधी उपलब्ध करण्यात त्या यशस्वी ठरत आहेत. मांगी तलावातील पाणी उचलण्यास स्थगिती मिळवण्यासाठी विखे पाटील यांच्या भेटीचे योग्य टायमिंग साधून रश्मीदीदी यांनी परिपक्व नेतृत्वाची चुणूक दाखवली असून लोकांना या निमित्ताने स्व मामांच्या कार्यपद्धतीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही
●शिंदे-विखे वादाची पार्श्वभूमी.●
अहमदनगरच्या राजकारणात भाजप नेते राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यातील संबंध प्रदीर्घ काळापासून चढ-उतारांचे आणि अंतर्गत संघर्षाचे राहिले आहेत. हे दोन्ही नेते एकाच पक्षात असूनही अहमदनगर जिल्ह्यातील वर्चस्वावरून त्यांच्यात अनेकदा राजकीय मतभेद आणि कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळाले आहे.
विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याकडून विधानसभा निवडणुकीतील पराभव, बाजार समितीमध्ये रोहित पवार यांच्या समसमान जागा येण्यात देखील विखे पिता-पुत्रांचा हात असल्याची उघड चर्चा झाली होती, तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान राम शिंदे-सुजय विखे यांच्यात दावेदारी नाट्य रंगले होते, अखेर फडणवीस यांनी मध्यस्थी करून विखे यांना उमेदवारी दिली होती.
राम शिंदे व विखे-पाटील यांच्यातील वादाचा रश्मी बागल यांनी पुरेपूर फायदा उठवला असून रश्मी बागल यांचा गनिमीकावा सध्या तरी यशस्वी झाल्याचे दिसत आहे.
