करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)
अकलूज (प्रतिनीधी)
माढा लोकसभा मतदारसंघातील पाणंद रस्ते कामांचा आढावा घेण्यासाठी आज अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर बैठक आयोजित केली होती. माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या पाच तालुक्यांमध्ये नकाशावरील अस्तित्वात असलेले 3029 रस्ते आहेत तर, नकाशावर नोंद नसलेले 5044 पानंद रस्ते आहेत. हे रस्ते नव्याने पुन्हा बांधण्यासाठी अकलूज येथे बैठक संपन्न झाली.
विकासकामे वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण व्हावीत, यासाठी आपण सर्वांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे व पंधरा फूट रुंदीच्या या पाणंद रस्त्यासाठी सरकारच्या वतीने 15 लाख रुपये प्रति किलोमीटर प्राधान्याने देण्यात येणार असल्याचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.
या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तसेच आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर, अधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावरती रस्ता करताना येणाऱ्या अडचणी बाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी महसूल अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाही. यावेळी खासदार मोहिते पाटील म्हणाले की महसूल आणि ग्रामसभा यांनी यापूर्वी सुचवलेल्या रस्त्यांनाच निधी देता येतो. त्याबरोबरच वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून जे लोड शेडिंग सध्या सुरू आहे त्यावरती त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना सुनावले.
माढा लोकसभा मतदारसंघातील विविध भागांतील पाणंद रस्ते कामांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी, स्थानिक समस्या आणि प्राधान्यक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामे अधिक गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आमदार व खासदार यांनी आवश्यक सूचना दिल्या.
आ. उत्तमराव जानकर यांनी सांगितले की पानंद रस्त्याची जे अडवणूक करतील त्यांचे आधार कार्ड पाच वर्षासाठी जप्त होईल व त्याची बँक खाते ही गोठविली जातील असा नियम शासनाने लागू केला आहे. त्याबरोबरच लोड शेडिंग न थांबविल्यास वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माढा लोकसभा मतदार संघातील करमाळा, माढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस,माण, खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांकडून त्या त्या गावातील पानंद रस्त्या संदर्भातील येणाऱ्या अडीअडचणी या बैठकीत जाणून घेण्यात आल्या व त्यावरती कसा मार्ग काढता येतोय यावरही चर्चा करण्यात आली.
