June 9, 2026
IMG-20260609-WA0002

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍🏻)

आदिनाथच्या लिलावावरून करमाळा तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले असून बागल, शिंदे व पाटील गटाकडून पत्रकार परिषदा व मुलाखतींतून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे.पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी “मकाई कारखान्यासाठी आदिनाथची तिजोरी रिकामी केली. आदिनाथच्या खात्यावरून मकाईच्या खात्यावर १ कोटी ६५ लाख रू ट्रान्स्फर केले” असा धक्कादायक आरोप केला होता , तळेकर वारंवार याच व्यवहारावरून बागल कुटुंबास टार्गेट करत होते.या व्यवहाराचा तपशील मागत होते.मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन तळेकर यांच्या आरोपाला पुराव्यानिशी उत्तर दिले. “आदिनाथला GST व वीज बिल भरण्यासाठी पैसे नव्हते. वेळेवर GST नाही भरली तर दंड होणार असल्याने आदिनाथच्या संचालक मंडळाने मकाईकडे आर्थिक मदतीसाठी पत्रव्यवहार केला होता. यामुळे मकाईनेच २०२१ मध्ये आदिनाथला १ कोटी ९६ लाख रू देऊन मदत केली. इतर अ‍ॅडव्हान्स पोटी काही रक्कम दिली होती त्यापैकी १ कोटी ६० लाख आदिनाथने परत केले आहेत. यातील ३६ लाख व इतर ॲडव्हान्स मिळून जवळपास ७३ लाख रू आदिनाथच मकाईला देणे लागतो. असे भांडवलकर यांनी स्पष्ट केले.“तळेकर यांनी आदिनाथ लिलावात जाण्याआगोदर मकाईने मदतीपोटी दिलेल्या रकमेतील ७३ लाख मकाईला परत द्या असे आपल्या चेअरमन साहेबांन् सांगावे व लोकांची दिशाभूल करण्याचे बंद करावे. पुरावा असेल तरच बोलावं. रश्मीदिदी बागल, दिग्विजय बागल यांच्या आदेशानुसार खोट्या आरोपांना आता पुराव्यासह चोख उत्तर देणार असून खोटे आरोप केल्यास मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा भांडवलकरांनी दिला.

 “आदिनाथ फक्त पाच वर्षे बागलांच्या ताब्यात” 

आदिनाथमध्ये फक्त पाच वर्षे बागल यांची एकहाती सत्ता होती. इतर वेळी जगताप गट, देवी गट, स्व. रावसाहेब पाटील, स्व. गोविंद बापू यांची देखील सत्ता होती. मग अधोगतीस फक्त बागल जबाबदार कसे? असा सवाल आदिनाथचे चेअरमन डोंगरे यांनी केला.नारायण पाटील व बागल युती होती तेव्हा स्वतः नारायण पाटील यांच्यासह पाच समर्थक संचालक होते. शेवटच्या दोन महिन्यात त्यांनी आदिनाथ अडचणीत आणण्यासाठी राजीनामा नाट्य घडवले. मर्जीतल्या कामगारांना हाताशी धरून आदिनाथची साखर विक्री अडवली. शेवटी परवानगी घेऊन बंदोबस्तात साखर विक्री केली म्हणून कामगारांना दिवाळीत काही रक्कम मिळाली. नारायण पाटील यांनी आमदारकी मिळवण्यासाठी आदिनाथ बंद पाडून बागलांची बदनामी करायचे कुटील राजकारण केले. शेवटी कर्म फिरून येत असते. आज त्यांच्याच कारकिर्दीत आदिनाथ लिलावात जातोय हे त्यांच्याच कर्माचे फळ असल्याचे डोंगरे म्हणाले.तळेकर यांच्या ‘आरोपांच्या तोफगोळ्यास’ ‘भांडवलकर व डोंगरे या जोडगोळीने आज पुराव्यासह चोख उत्तर देऊन ताळेबंदच सादर केला आहे’.आत्ता सुनील तळेकर या उत्तरांचे पोस्टमार्टेम करणार ,का आदिनाथ च्या वादावर पडदा पडणार? या कडे तालुक्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *