April 28, 2026
IMG-20260428-WA0011

              करमाळा_चौफेर

करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पंचायत समितीच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल, अशी ग्वाही सभापती पूजा ढेरे यांनी दिली. बागल निवासस्थानी आयोजित पंचायत समिती सदस्यांच्या विशेष बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला सोलापूर जिल्हा भाजपा युवा नेते दिग्विजय बागल यांची प्रमुख उपस्थिती होती.

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता तालुक्यातील कोणत्याही गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, या दृष्टीने बैठकीत बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. टंचाईग्रस्त भागात नवीन विंधन विहिरी घेणे, खासगी बोअर अधिग्रहित करणे आणि आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भात लवकरच तालुक्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांची समन्वय बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.तालुक्यात सध्या भारनियमनामुळे शेती आणि घरगुती वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांची भेट घेऊन वीज प्रश्न सोडवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.नूतन उपसभापती अजित विघ्ने यांनी यावेळी पंचायत समितीच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ज्ञान मिळावे यासाठी शाळांमध्ये ‘एआय’ (AI) तंत्रज्ञान, संगणक प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच, ‘उमेद’ अभियानांतर्गत महिला बचत गटांना अधिक सक्षम करून महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.

तालुक्यातील ज्या गावांमध्ये अद्याप स्मशानभूमीची सुविधा नाही, तिथे प्राधान्याने कामे हाती घेण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासोबतच घरकुल, विहिरी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक कारभार केला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या बैठकीला पंचायत समितीचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमुळे करमाळा तालुक्याच्या विकासकामांना आता अधिक गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *