करमाळा_चौफेर ( शंभू फरतडे ✍🏻)
शेतकऱ्यांच्या शेतातील उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या करमाळा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत बीड जिल्ह्यासह करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील सराईतांना गजाआड करत त्यांच्याकडून ९ लाख ५० हजार रुपये किमतीचे तीन ट्रॅक्टर आणि एक ट्रॉली असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दमदार कामगिरीमुळे करमाळा तालुक्यातील ट्रॅक्टर चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.
करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन वर्षांपासून ट्रॅक्टर चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामध्ये वीट येथील विजयकुमार गाडे यांचा सोनालिका ट्रॅक्टर, शेटफळ येथील रंगनाथ पोळ यांचा जॉन डियर ट्रॅक्टर, पोंधवडी येथील आलीम सय्यद यांचा महिंद्रा नोवो ट्रॅक्टर व ट्रॉली आणि माळशिरस तालुक्यातील पानिव येथील सागर खवळे सध्या रा.चिखलठाण यांचा महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर व ट्रॉली असे एकूण चार गुन्हे दाखल होते.
या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेतले.
अटक आरोपींमध्ये किरण सुभाष माळी (वय ३२, रा. केळ पिंपळगाव, ता. आष्टी, जि. बीड) आणि दिगंबर उर्फ बापू ज्योतीराम गुटाळ (वय ३३, रा. चिखलठाण नं. २, ता. करमाळा) यांचा समावेश आहे. चौकशीत त्यांनी चारही गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील वाहने जप्त करण्यात आली आहेत. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, हनुमंत जाधव, पांडुरंग आरकिले, सातव, गोरे, वैभव टेंगल, बहीरे, गटकुळ, रंदील, येवले, गोसावी, शिंदे, कोपनर आणि सायबर शाखेचे जहिरान नाईकवाडी यांच्या पथकाने हि दमदार कामगिरी केली आहे.
दुष्काळी परस्थीती चा सामना करत असताना चोरी गेलेले ट्रकट्रर परत मिळाल्याने शेतकऱ्यांकडून पोलीसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सदर घटनेत आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता असून त्या दृष्टीकोनातून पोलीसांकडून तपास व्हावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे
