October 7, 2026

करमाळा_चौफेर

भाजपच्या कार्यक्रमानिमित्त करमाळा दौऱ्यावर आलेले विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी बाजार समिती आवारातील देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आ. राजेंद्र राऊत म्हणाले की, “आदरणीय जयवंत भाऊ हे माझ्यासाठी मोठ्या बंधूप्रमाणे आहेत. माझ्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी नेहमीच आशीर्वाद आणि मार्गदर्शन केले आहे. आमचा गेल्या ३० वर्षांपासूनचा दोस्ताना असून एकमेकांबद्दल जिव्हाळा आहे.”दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सत्कार न स्वीकारता आदिनाथ महाराज व आई कमलाभवानी यांच्या प्रसादरूपी आशीर्वादाचे श्रीफळ जयवंतराव जगताप यांच्या हस्ते स्वीकारत असल्याचेही त्यांनी सांगितले. कै. नामदेवराव जगताप, भाऊसाहेब झाडबुके आणि प्रभाताई झाडबुके यांच्या काळातील राजकारणाचा तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा आ. राऊत यांनी आवर्जून उल्लेख केला. सामाजिक विषयांवर जयवंतराव जगताप यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.विधान परिषद निवडणुकीनंतर प्रथमच करमाळ्यात आलेल्या आ. राजेंद्र राऊत यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, “ग्रामपंचायतीपासून सुरू झालेला माझा राजकीय प्रवास संघर्षातून पुढे आला. सर्वसामान्यांची कामे निःपक्षपातीपणे करत आज विधान परिषदेपर्यंत पोहोचलो आहे.” मागील विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्ह्यातील जयवंतराव जगताप यांच्यासारख्या सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील ११ तालुक्यांचे प्रतिनिधित्व करून जनसेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.करमाळा तालुक्यातील विकासकामांबाबत बोलताना आ. राऊत म्हणाले की, शेलगाव येथील केळी निर्यात केंद्र, उपसा सिंचन योजना तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून होणाऱ्या विविध विकासकामांसाठी शासनदरबारी प्रभावीपणे पाठपुरावा केला जाईल. तसेच आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू झाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत बोलताना आ. राजेंद्र राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. प्रशासकाच्या काळात जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. “माझ्या तालुक्यातील १३५ पैकी १३० ठराव माझ्या बाजूने आहेत. जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीसी बँकेची निवडणूक लढवून सर्वांना सोबत घेऊन बँकेचे कामकाज पुढे नेऊ,” असे ते म्हणाले. मात्र, “मला डीसीसी बँकेच्या चेअरमनपदात स्वारस्य नाही आणि मी चेअरमन होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. बँकेच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देत सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली. “करमाळा तालुक्यातील कोणतेही काम सांगा, ते पूर्णत्वास नेण्यासाठी मी प्रयत्न करेन,” असे आश्वासनही आ. राऊत यांनी यावेळी दिले.जयवंतराव जगताप यांनीही दिला दोस्तीला उजाळा

यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. विधानसभा तसेच जिल्हा बँकेत काम करत असतानाचे काही जुने किस्से सांगत त्यांनी आ. राजेंद्र राऊत यांच्यासोबतच्या तीन दशकांच्या मैत्रीला उजाळा दिला. राजाभाऊ राऊत यांना भविष्यात मोठमोठ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी ईश्वराने सामर्थ्य द्यावे, अशा शुभेच्छा जगताप यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे जिल्हा बँकेचे माजी संचालक अरुण कापसे, बार्शीचे माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक भारत पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, करमाळ्याचे माजी नगराध्यक्ष अमोद संचेती,  बाजार समितीचे उपसभापती बबन मेहेर, संचालक तात्यासाहेब शिंदे, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, दादासाहेब जाधव, जनार्दन नलवडे, मनोज पितळे, परेश दोशी, शहाजी शिंगटे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विक्रांत मंडलेचा, नगरसेवक सचिन अब्दुले, रोहिदास आल्हाट, युवराज चिवटे, सुजित बागल यांच्यासह बाजार समिती व खरेदी-विक्री संघाचे आजी-माजी संचालक, नगरसेवक, गटसचिव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दत्तात्रय भागडे सर  यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *