September 6, 2026
IMG-20260906-WA0041

करमाळा_चौफेर

करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन २०२४, २०२५ व २०२६ या तीन वर्षांमध्ये गहाळ झालेले तब्बल २८ महागडे मोबाईल फोन करमाळा पोलिसांनी शोधून काढत मूळ तक्रारदारांना परत केले आहेत. या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत ६ लाख ३० हजार रुपये इतकी आहे.करमाळा पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई करण्यात आली. गहाळ मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे व केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलद्वारे शोध घेण्यात आला. ट्रेस झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणांहून हे मोबाईल हस्तगत करून २८ तक्रारदारांना विना विलंब परत करण्यात आले आहेत. आपला हरवलेला महागडा मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत करमाळा पोलिसांचे आभार मानले.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंजना कृष्णा (IPS) मॅडम, करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यामध्ये CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील शेरखाने, पो.कॉ. प्रकाश जगदाळे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पो.कॉ. सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

यापुढेही कोणाचाही मोबाईल गहाळ झाल्यास त्यांनी तात्काळ आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये मोबाईलच्या संपूर्ण कागदपत्रांसह रितसर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रणजीत माने यांनी केले आहे.

“मोबाईल चोरीला गेल्यावर चोरी ऐवजी गहाळ ची तक्रार दाखल केली जाते . आज मोबाईल परत केले आहेत पण हे मोबाईल कोणी चोरले होते? कुठे गहाळ झाले होते याचा छडा लागला पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *