August 23, 2026
IMG-20260823-WA0096

करमाळा_चौफेर ( संजय जाधव केम ✍ ) 

सालाबाद प्रमाणे श्रावणातील पहिल्या सोमवार निमित्त श्री उत्तरेश्वर बाबांच्या पालखीची मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडली. सोमवारी पहाटेपासूनच श्री उत्तरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून बारीची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरात भाविकांच्या वतीने मसाले दुधाचे वाटप सुरू होते.सकाळी आठ वाजता श्रींना अभिषेक करण्यात आला. इकडे भोई मंडळी आणि पालखीच्या मानकऱ्यांनी पालखीची आकर्षक सजावट केली. बरोबर साडे नऊ वाजता प्रथेप्रमाणे विजय कुलकर्णी यांनी देवाला फूल लावले. हे फूल पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी दाट गर्दी केली होती. त्यावेळी मंदिर परिसर “बोला पार्वतीपते शिव हर हर” च्या गर्जनेने दणाणून गेला. त्यानंतर श्रीची आरती झाली. मंदिराचे पुजारी समाधान गुरव यांनी शंखनाद केला. फूल पिंडीसमोर खाली आल्यानंतर विजय कुलकर्णी यांनी ते फूल हातात घेऊन पालखीत ठेवले आणि त्यानंतर मंदिरातून पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला.या मिरवणुकीमध्ये हालग्याचा पठ्ठा, सनई ताफा, शिंगाडे आदी पारंपरिक वाद्यांचा समावेश होता. तब्बल सात तास ही पालखी मिरवणूक सुरू होती. प्रथम पालखी शिवशंभो वेसजवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आली. तेथे आरती झाल्यानंतर पालखीने गावात प्रवेश केला. श्रीच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. हजारो भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण केम परिसर हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.छबिन्याच्या ठरलेल्या मिरवणूक मार्गावरून ही पालखी दक्षिणेश्वर, केमेश्वर, मदनेश्वर, बसवेश्वर आदी शिवलिंगांची भेट घेत पाटील गल्ली येथे विसाव्यासाठी आली. तीन खणीत येथे पालखी विसाव्यासाठी थांबली. त्यानंतर पालखीचे मंदिराकडे प्रस्थान झाले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी चहा, मसाले दूध, केळी, सफरचंदाचे वाटप केले.या पालखी सोहळ्यासाठी श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, मठाधिपती महंत जयंतगिरी महाराज आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी पुन्हा मंदिरात आल्यानंतर श्रीच्या आरतीने या पालखी सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना महाप्रसाद म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *