July 5, 2026
IMG-20260705-WA0041

करमाळा चौफेर (शंभू फरतडे✍🏻)

नेक वर्षांपासून बंद असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना लि., आदिनाथनगर, ता. करमाळा सुरू करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. कारखाना प्रशासनाने संपूर्ण प्लांट आणि मशिनरी सह १० वर्षांसाठी सहयोगी तत्वावर चालवण्यास देण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवली आहे.यासोबतच १५ जुलै २०२६ रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली असून, याच बैठकीत या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम २० अ नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. शेलगाव-भाळवणी येथील आदिनाथ कारखान्याचा संपूर्ण प्लांट हंगाम २०२६-२७ ते २०३४-३५ या १० वर्षांसाठी सहयोगी तत्वावर देण्यात येणार आहे.नोटीसमध्ये म्हटले आहे की, प्रकल्प पाहणी ०९/०७/२०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३०. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: १३/०७/२०२६ रोजी दुपारी ३.० वाजेपर्यंत. अर्ज फक्त कारखाना कार्यालयातून सोमवार ते शनिवार सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत मिळतील.

●१५ जुलैला विशेष सभा; एकच विषय●

आमदार व चेअरमन मा. नारायण गोविंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. १५/०७/२०२६ रोजी दुपारी १.० वाजता कारखाना कार्यस्थळावर अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेपुढे शासनाच्या दि. ०८/०९/२०२० च्या शासन निर्णयाप्रमाणे आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम २० नुसार आदिनाथ कारखाना सहकारी किंवा खाजगी कंपनीस सहयोगी तत्वावर चालविण्यास देणे बाबत निर्णय घेणे हा एकमेव विषय आहे. त्यामुळे याच बैठकीत आदिनाथ भाडेकरारावर देण्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा सुरू आहे. या नोटिसा प्र. कार्यकारी संचालक एस. एच. राऊत, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना लि. यांच्या सहीने प्रसिद्ध झाल्या आहेत.

●आदिनाथचा ‘नाथ’ कोण होणार?●

आदिनाथचा सुरुवातीला रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो बरोबर भाडेकरार झालेला होता. मात्र या विरोधात आदिनाथच्या तत्कालीन संचालकांनी कोर्टात दावा दाखल केला आहे. तसेच  बँकेनेही कर्जासंदर्भात दावा दाखल केला आहे. 

दरम्यान, बारामती अग्रो चा देखील कारखाना घेण्यासाठी दावा आहे. याशिवाय बोत्रे पाटील व  एकनाथ शिंदे यांचे काही निकटवर्तीय हे देखील कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आदिनाथचा ‘नाथ’ कोण होणार याची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *