(करमाळा_चौफेर-) करमाळा तालुक्यातील मांगी तलावाचे पाणी हाळगावला वळविण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यानंतर आता या मुद्द्यावरून करमाळ्याचे राजकारण तापले आहे. आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी मोठा राजकीय दावा करत भाजपच्या जि. प. गटनेत्या रश्मी बागल यांच्यावर निशाणा साधला आहे.
“माजी आमदार संजयमामा शिंदे यांना २०२९ मध्ये आमदार करण्यासाठी रश्मीदिदी बागल आता राजकारणात अधिक सक्रिय झाल्या आहेत,” असे मोठे विधान सुनील तळेकर यांनी केले आहे. मांगी तलावाच्या पाणी प्रश्नावर रश्मी बागल यांनी घेतलेल्या भूमिकेमागे हीच राजकीय खेळी असल्याचा त्यांचा आरोप आहे.
तळेकर यांनी बागल-शिंदे युतीच्या अंतर्गत करारावर बोट ठेवले. त्यांच्या म्हणण्यानुसार जि. प. व पं. स. निवडणुकीत बागल-शिंदे गटाची युती झाली आणि दोन्ही गट सत्तेतही सामील आहेत.युतीच्या अटीशर्तीनुसार संजयमामा शिंदे यांनी करमाळ्याच्या अंतर्गत राजकारणात जास्त हस्तक्षेप करायचा नाही, मकाई कारखाना, पंचायत समिती व बाजार समिती निवडणुकीत शिंदे गटाने बागल गटाला पाठिंबा द्यायचा. याबदल्यात २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत संजयमामा शिंदेंना आमदार करण्यासाठी बागल गटाने पूर्ण ताकद लावायची असे ठरले आहे. व “सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडी याच अटीशर्तींनुसार सुरू आहेत,” असा दावा तळेकर यांनी केला.
मांगी तलावातून हाळगावच्या कृषी महाविद्यालयाला पाणी नेण्यास विरोध करण्यासाठी संजयमामा शिंदे गटाचे पहिल्या फळीचे नेते सुजीत बागल यांच्या पुढाकाराने आंदोलन सुरू झाले होते. तळेकर यांचा दावा आहे की, सुजीत बागल हे मांगी गावात रश्मी बागल यांचे प्रमुख राजकीय विरोधक आहेत. त्यांनीच रश्मी बागल यांचे राजकीय अस्तित्व डळमळीत करण्याचा प्रयत्न केला होता. असे असतानाही युतीच्या करारामुळे रश्मी बागल यांना सुजीत बागल यांच्या आंदोलनाला शासन पातळीवर प्रयत्न करून पाठिंबा द्यावा लागला आणि जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्याकडे जाऊन स्थगिती मिळवावी लागली.असे तळेकर यांनी म्हटले आहे.
“संजयमामा शिंदे हे २०२९ मध्ये आमदार नारायण आबा पाटील यांच्यासाठी प्रमुख विरोधक असणार आहेत. त्यामुळे बागल गटाने २०२९ साठीची आपली भूमिका जनतेसमोर उघड करून दाखवावी. कदाचित अशी उघड भूमिका घेण्याची हिंमत दिग्विजय बागल व रश्मीदिदी बागल यांच्यात नाही,” असा टोला सुनील तळेकर यांनी लगावला.
तळेकर यांच्या या विधानामुळे करमाळा तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. मांगी पाणी प्रश्नावरून मिळालेली स्थगिती ही रश्मी बागल यांच्या पाठपुराव्याचे यश असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. तर पाटील गटाने हा संजयमामा शिंदे यांच्यासाठीचा राजकीय सेटअप असल्याचा आरोप केला आहे.
