करमाळा_चौफेर
राज्य शासनाच्या 2026 च्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटींविरोधात युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), करमाळा आक्रमक झाली आहे. “शेतकऱ्यांना सरसकट व सन्मानजनक कर्जमाफी लागू करा, अन्यथा जाचक अटींच्या जीआरची होळी करू” असा इशारा देण्यासाठी उद्या शुक्रवार दि. 12 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता करमाळा तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.
युवासेना तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे यांच्या नेतृत्वाखाली दिले जाणाऱ्या निवेदनात फसव्या शासन निर्णयाची (जीआर) प्रतिकात्मक होळी करण्याचा इशारा देत शेतकऱ्यांच्या संतापाची झलक दाखवली जाणार आहे.
या निवेदनात युवासेनेकडुन खालील महत्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत 👇🏻
●सर्व जाचक अटी तात्काळ रद्द करा●
२०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ न करता २०२६ मध्ये केवळ ५० हजार पर्यंतच मर्यादित लाभ देणे व उर्वरित कर्ज पूर्ण भरण्याची अट अन्यायकारक आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंतचे सर्व थकीत पीककर्ज व मुदत कर्ज यांचा समावेश करून सरसकट कर्जमाफी लागू करावी.
●’चार वेळा कर्जफेड’ ची अट रद्द करा ●
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळण्यासाठी ‘चार वेळा कर्जाची परतफेड केलेली असावी’ ही अट घातल्याने प्रामाणिक व अल्पभूधारक शेतकरीही लाभापासून वंचित राहत आहेत. ही अट तात्काळ रद्द करून नियमित कर्जफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे.
● प्रोत्साहन अनुदानात वाढ करा ●
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या देण्यात येणारे ५० हजार चे प्रोत्साहन अनुदान वाढवून १ लाख करण्यात यावे, जेणेकरून कर्जफेडीची शिस्त कायम राहील व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
●सातबारा कोरा करा ●
मा. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करण्यात यावा कारण जाचक अटींमुळे प्रत्यक्षात अवघ्या १०% शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळत आहे.
उपरोक्त मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने करमाळा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा व बेमुदत ठिय्या आंदोलन करून कर्ज माफी जि आर ची होळी करमाळ्यात येईल असा इशारा देण्यात आला असून शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी केले आहे.
