June 11, 2026
IMG-20260611-WA0027

करमाळा_चौफेर

करमाळा तालुक्यात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा विषय गाजत असतानाच, आमदार नारायण आबा पाटील गटाने आपला रोख आता मकाई सहकारी साखर कारखान्याकडे वळवला आहे. मकाई कारखान्यास मिळालेल्या १४० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचा तपशील पाटील गटाच्या हाती लागला असून, १२ जून रोजी तालुक्यातील जनतेसमोर पुराव्यानिशी सर्वात मोठा खुलासा करण्यात येणार असल्याचे सूचक विधान पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले आहे.याबत बोलताना तळेकर म्हणाले, “मकाई सहकारी साखर कारखान्यास १४० कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज मिळूनही हा कारखाना बंद आहे. हा पैसा नेमका कुठे गेला, याचा हिशोब तालुक्यातील जनतेसमोर बागल गटाने मांडावा. अन्यथा आम्हीच ही आकडेवारी जनतेसमोर मांडू.”तळेकर यांनी पुढे सांगितले की, “आदिनाथ कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे न केल्यामुळेच त्याच्यावर बिकट परिस्थिती ओढावली. बागलांनी सभासदांपासून सर्वकाही लपवून ठेवले होते. पण आता मकाईचे तसे होऊ देणार नाही. मकाईला १४० कोटी रुपये कशासाठी हवे होते याची आकडेवारीसह माहिती व साखर आयुक्तांची सही असले दस्तऐवज आमच्याकडे प्राप्त झाले आहेत.”पाटील गटाने मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांना थेट आव्हान दिले आहे. “त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संचालक मंडळाने हे १४० कोटी रुपये मकाई कारखान्यासाठी कशाप्रकारे खर्च केले, याचा तपशीलवार खुलासा करावा. अन्यथा १२ जून रोजी आम्हीच साखर आयुक्तांचे निर्देश व मकाईच्या मागणीनुसार मिळालेल्या १४० कोटींतील महत्त्वाचे मुद्दे सर्वकाही जनतेसमोर मांडू,” असे तळेकर म्हणाले.“यानंतर मकाईचे सभासद आणि जनता स्वतः कार्यस्थळावर काम झाले का? कामगारांच्या खात्यात पैसे वर्ग झाले का? याची सत्यता पडताळून पाहतील. त्यामुळे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी आपल्या नेत्यांच्या उपस्थितीत सर्व माहिती करमाळा तालुक्यातील जनतेसमोर मांडावी. अथवा या १४० कोटींवर खुले डिबेट करण्यासाठी तयार रहावे. सत्य फार काळ झाकून राहणार नाही. तुम्ही माहिती देणार नसाल तर आम्ही या गोष्टी उजेडात आणू,” असा इशारा सुनील तळेकर यांनी दिला.

याआधी मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी आदिनाथ कारखान्यासोबत झालेल्या व्यवहारावरून तळेकर यांना पुराव्यासह सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर बॅकफूटवर गेलेल्या तळेकर यांनी पुन्हा फ्रंटफूटवर येत मकाईला लक्ष्य केले आहे.

त्यामुळे आता तळेकर यांच्या नव्या आरोपांचे खंडन चेअरमन दिनेश भांडवलकर कशा प्रकारे करतात, याकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. १४० कोटींच्या खर्चाचा खुलासा करून ते पाटील गटाचा डाव उधळतात का, की खुले डिबेट स्वीकारतात, हे १२ जूननंतर स्पष्ट होणार आहे.पाटील गटाने “सत्य फार काळ झाकून राहणार नाही” असे म्हटले असताना, बागल गटाकडूनही याला जोरदार प्रतिउत्तर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे करमाळ्यातील या कारखाना संदर्भातील आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा कलाटणी मिळणार असल्याचे चित्र   निर्माण झाले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *