आजच्या राजकारणात “नावापुढे पद” लागताच अनेक युवक बेभान होतात. मात्र आमदार पुत्र, पैलवान असूनही पाय जमिनीवर ठेवून चालणारे, व्यसनाला थारा न देणारे, नीतिमत्ता व नैतिकता जपणारे आणि ज्येष्ठांचा मान-सन्मान राखणारे एक सुसंस्कृत युवा नेतृत्व म्हणजे आमदार नारायण आबा पाटील यांचे चिरंजीव पै. पृथ्वीराज (भैय्या) पाटील . 
क्षमता असूनही “घराणेशाही नको” या भूमिकेतून नारायण आबांनी जिल्हा परिषद निवडणुकीत पृथ्वीराज भैय्याला उमेदवारी नाकारली. पण भैय्याने नाराजीचा लवलेशही न दाखवता एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून प्रचाराची धुरा सांभाळली आणि गटाचे उमेदवार विजयी करण्यासाठी जीवाचे रान केले.
आज महाराष्ट्रात आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद एकाच घरात असताना विधान परिषदेसाठी रुसून बसणारे नेते पाहताना, स्वतःच्या मुलाचे जिल्हा परिषद तिकीट कापून कार्यकर्त्याला संधी देणारे नारायण आबा हे खरेच महाराष्ट्रातील आदर्श राजकारणी ठरतात. मुळात पाटील गटाची वाटचाल घराणेशाहीतून नव्हे, तर लोकभावनेतून झाली आहे. सामान्य कुटुंबातील आबांनी स्व. गोविंद बापूंच्या मार्गदर्शनाखाली सरपंच ते आमदार हा प्रवास केला व लोकांनीच त्यांना ‘लोकनेते’ ही पदवी बहाल केली.
आबांचाच आदर्श घेऊन चालणाऱ्या पृथ्वीराज भैय्याची कार्यपद्धती कौतुकास्पद आहे. कार्यालयात दिवसभर बसून जनतेची गाऱ्हाणी ऐकणे व जागेवरच निपटारा करणे हा त्यांचा स्थायीभाव. एखाद्या कुटुंबावर अन्याय होत असेल व सांगूनही फरक पडत नसेल, तर ‘साम, दाम, दंड, भेद’ वापरण्याची धमक देखील भैय्यामध्ये आहे. ते बाळकडू त्यांना जन्मजातच मिळाले आहे
आमदार पुत्र आहे म्हणून कधीही प्रशासकीय अधिकाऱ्यांना आरेरावी नाही. आपला कार्यकर्ता आहे म्हणून चुकीला पाठिशी घालताना पोलीस-महसूल प्रशासनाशी वाद नाही. शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत आपुलकीने वागल्याने सर्वच अधिकारी पृथ्वीराज भैय्याला योग्य सन्मान देतात.
लोभस, शांत व संयमी स्वभावामुळे ग्रामीण भागातील असंख्य तरुणांचे संघटन भैय्याने केले आहे. “राजकारण दुय्यम, आधी व्यवसाय, शिक्षण, शेती व शरीरयष्टी सांभाळा, व्यसनापासून दूर रहा” हा मोलाचा संदेश ते युवकांना नेहमी देतात. “युवकांची ताकद फक्त राजकारणासाठी नाही, तर ते तालुक्यासह देशाचे भविष्य बदलण्यासाठी आहे” हे ते आवर्जून सांगतात.
प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून भैय्याने ओळख निर्माण केली आहे. अतिवृष्टीच्या संकटात ‘सरपंच कसा असतो’ ते त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. अंधाऱ्या रात्री कंबरेपर्यंत पाण्यात उतरून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून आधार देण्याचे काम भैय्याने केले. जीवाला जीव देणारे भैय्यांचे सवंगडी रात्रभर जेऊरकरांच्या सेवेत होते. दुसऱ्या दिवशी जीवनावश्यक साहित्य, औषधोपचार याची स्वतः काळजी घेतली, तालुक्यातील इतर गावात अन्नधान्य-कपडे पुरवले,पण याची कुठेही स्वतःहून जाहिरातबाजी केली नाही.
“जनतेत राहून जनतेची सेवा करायची. आपण योग्य वाटलो तर जनता संधी देईल. नेतृत्व लादले गेले नाही पाहिजे, लोकांनी स्वीकारले पाहिजे” असे भैय्या नेहमी बोलून दाखवतात. वडिलांचा समाजसेवेचा व राजकीय वारसा चालवण्याची धमक त्यांच्यात ठासून भरलेली आहे. म्हणूनच तालुक्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले नेतृत्व म्हणून पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.
पृथ्वीराज भैय्याना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक-✍🏻
पै. विरेंद्रप्रताप विकास (बापू) गलांडे (चिखलठाण)
