May 22, 2026
IMG-20260522-WA0039

करमाळा_चौफेर( शंभू फरतडे )

अधिक मासानिमित्त संत गजानन महाराज मंदिर परिसर, करमाळा येथे आयोजित 7 दिवसीय भव्य शिवमहापुराण कथा गुरुवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. 15 मे ते 21 मे या कालावधीत झालेल्या या धार्मिक महोत्सवाने संपूर्ण करमाळा नगरी अक्षरशः शिवमय झाली होती . “हर हर महादेव”च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला आणि हजारो शिवभक्तांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.कथेचे निरूपण ह.भ.प. स्नेहगंगाश्री आळंदीकर माई यांनी केले. त्यांच्या प्रभावी आणि ओजस्वी वाणीतून भगवान शिवशंकरांच्या भक्तीचे महत्त्व, बारा ज्योतिर्लिंगांचे आध्यात्मिक सामर्थ्य, अर्धनारीनटेश्वर रूपातील शिवशक्तीचे तत्त्वज्ञान उलगडले. माई म्हणाल्या: _”बारा ज्योतिर्लिंगांच्या केवळ स्मरणानेही पापांचा नाश होतो. शिवभक्ती ही मानवाच्या जीवनाला समाधान, शांती आणि कल्याण देणारी दिव्य शक्ती आहे.”_ त्यांच्या प्रवचनाने उपस्थित भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.कथेदरम्यान भगवान शिवशंकर आणि देवीचे अर्धनारीनटेश्वर रूप यांचा आकर्षक सजीव देखावा सादर झाला. संत गजानन महाराजांच्या आराध्य दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या भव्य देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधले. “गण गणात बोते” च्या जयघोषात भाविक नतमस्तक झाले. महिला भगिनींनी देवीसमोर पारंपरिक फुगड्या घालून आरती केली. “तुळजाभवानी माता की जय”, “जगदंबे की जय”, “सप्तशृंगी माते की जय” अशा जयघोषांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.सांगता सोहळ्यास माजी आमदार जयवंतराव जगताप, तहसीलदार सौ. शिल्पाताई ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, जामखेडच्या नगराध्यक्षा सौ. प्रांजल चिंतामणी, नगरसेवक अमित चिंतामणी, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, नगरसेवक सचिन गायकवाड, जामखेडचे शिवसेना नेते आकाश बाफना यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आयोजनाचे कौतुक करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

स्व. डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्या स्मरणार्थ डॉ. रोहन पाटील परिवाराकडून महाप्रसादाचे अन्नदान झाले. करमाळा शहर व तालुक्यातील हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.  मुख्य यजमान श्रेणिकशेठ खाटेर, सौ. संगीता खाटेर, ॲड. संकेत खाटेर, मोक्षा खाटेर व वर्धमान खाटेर यांनी परिवारासह महाआरती व ग्रंथपूजन करून कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती, संत गजानन महाराज मंदिर समिती, भक्त परिवार, एसटी कॉलनी महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. सौ. रंजना कुरूलकर, नारायण पवार, कालिदास घोगरे, श्रीपाद आडकर, जगदीश शिगची, नवनाथ चौधरी, रवींद्र विद्वत, पत्रकार दिनेश मडके, हनुमानसिंग परदेशी, वैभव दोशी, प्रदीप देवी, नितेश देवी, आशिष बोरा, गणेश बोरा, नगरसेवक दीपक चव्हाण, महावीर फर्निचर स्टाफ, सुरेश आटोळे, गणेश महाडिक, राणी महाडिक, गिरीश शहा, ननवरे मामा, विजय बरीदे, अक्षय शिंदे, नागेश पवार आदींचे सहकार्य लाभले.

‘धार्मिक कार्यासाठी पूर्व पुण्याई लागते’ – जयवंतराव जगताप- 

सांगता सोहळ्यात बोलताना माजी आ. जयवंतराव जगताप म्हणाले: “ज्याच्या प्रारब्धात परमेश्वराने असे कार्य लिहून ठेवले आहे, तोच व्यक्ती हे कार्य यशस्वीपणे पार पाडू शकतो. त्यासाठी पूर्व पुण्याई आवश्यक असते. अशा धार्मिक कार्यामागे परमेश्वराची कृपाच असते. समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे.”_ त्यांनी श्रेणिकशेठ खाटेर, रंजना कुरूलकर, श्रीमद् भागवत कथा समिती, संत गजानन महाराज भक्त परिवार च्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ. ज्योती मुथ्था मॅडम यांनी केले. आभार मुख्य यजमान श्रेणिकशेठ खाटेर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *