May 16, 2026
IMG-20260516-WA0026

करमाळा_चौफेर

‘डिकसळ-कोंढारचिंचोली पुलाचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून करावे, जेणेकरून पावसाळ्यातही काम चालू राहील, अशी मागणी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली होती आणि आज त्यानुसारच काम चालू आहे. जिल्हा परिषद सदस्य सुभाष गुळवे यांनी श्रेयाचा तराजू हातात घेऊन माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पारड्यात माप टाकण्याचा प्रयत्न करू नये’, असा घणाघाती हल्लाबोल आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला आहे.जि.प. सदस्य सुभाष गुळवे यांनी डिकसळ पुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर या कामाचा पाठपुरावा माजी आमदार संजयमामा शिंदे करत असून त्यांनी केलेल्या मागणीनुसार कामाच्या डिझाईनमध्ये बदल झाला आहे’ असे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले होते.यावर तळेकर म्हणाले, ‘सन 2019 ते 2024 या आमदार पदाच्या कार्यकाळात माजी आमदार संजयमामा शिंदे हे डिकसळ पुलाचे काम पूर्णत्वास नेऊ शकले नाहीत. निवडणूक आली की केवळ बॅनरबाजी करून या रेंगाळलेल्या कामावरच मतांचा जोगवा मागण्याचे काम केले. तब्बल पाच वर्षात हे काम तडीस नेता आले नाही.’तळेकरांनी सांगितले की, ‘2024 नंतर आमदार नारायण आबा पाटील यांनी सुत्रे हाती घेताच रखडलेल्या कामांचा पाठपुरावा केला. प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसमवेत पुलाची पाहणी केली तेव्हा उजनीच्या पाणी पातळीत पावसाळ्यात वाढ होत असल्याने ठेकेदाराने चार वर्षे काम केले नाही. पाण्यात बांधकाम अवघड असल्याचे सांगून उशीर लावला. डिकसळ पुलाच्या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश नसल्याने ठेकेदार उशीर लावतो आहे, हे अधोरेखित झाले.’आमदार पाटील यांनी सदर कामाच्या आराखड्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करावा जेणेकरून पाण्यातही बांधकाम गतीने चालू राहील, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली. अधिवेशनात सुद्धा हा प्रश्न मांडला. त्यावरूनच आता कामात बदल झाला आहे’ असे तळेकर म्हणाले.’बाकी या कामाची मंजुरी व निधी जरी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या काळात प्राप्त झाल्याचे सुभाष गुळवे सांगत असले तरी पाच वर्षे तत्कालीन आमदार महोदयांनी झोपा काढल्या का, या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे’, असा सवाल तळेकरांनी केला.

‘उजनीतून माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या समवेत जलविहार अथवा नौकानयन करत असताना सुभाष आबांना या कामाची एकदाही आठवण का झाली नाही, हे पश्चिम भागातील नागरिक जाणून आहेत’, असा टोलाही तळेकरांनी लगावला तसेच ‘मध्यंतरी जुना पूल पाणी वाढल्याने खचल्याचे लक्षात येताच आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रत्यक्षात कार्यस्थळावर जाऊन पाहणी केली होती व त्यानंतर नवीन पुलाचे काम अधिक वेगाने सुरू झाले पाहिजे यासाठी पाठपुरावा सुरु केला होता’, असे देखील तळेकर म्हणाले आहेत. सुभाष आबा गुळवे यांनी श्रेयवादात माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या बाजूने युक्तिवाद करू नये. एक जिल्हा परिषद सदस्य या नात्याने स्वतः काही करता येत असेल तर करावे , असा सल्लाही तळेकरांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *