करमाळा_चौफेर
करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचा बोजवारा उडाला असून अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. योजना १०० दिवस चालली ११० दिवस चालली अशी पेपरबाजी करण्यामध्ये पाटील गटाचे प्रवक्ते व्यस्त आहेत परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र खूप वेगळी आहे. पांडे, म्हसेवाडी, सौंदे, शेलगाव क, फिसरे, हिसरे ,अर्जुननगर या गावांना उन्हाळी आवर्तनाचे पाणी मिळालेले नाही. या प्रकाराची दखल घेऊन पंचायत समिती सदस्य भरत भाऊ अवताडे यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की,गेल्या २ महिन्यांपासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे .या आवर्तनाचे पाणी लाभक्षेत्रातील व माझ्या पंचायत समिती गणातील सौंदे, शेलगाव क ,फिसरे, हिसरे, अर्जुननगर आदी गावांना मिळालेले नाही. याविषयी मी आपल्याबरोबर वारंवार चर्चा केलेली आहे, परंतु अद्यापही या गावांना पाणी मिळालेले नाही.
रब्बी आणि उन्हाळी आवर्तन सलग ३ महिने चालल्याच्या बातम्या आंम्हाला वर्तमानपत्रातून वाचायला मिळत आहेत.असं असताना माझ्या गणातील गावांना मात्र एक थेंबही पाणी मिळालेले नाही. मग नेमके हे पाणी मुरले कुठे ? या गावावरती अन्याय का होत आहे ? या प्रश्नांची लेखी उत्तरे मला आपल्याकडून अपेक्षित आहेत.येत्या २ दिवसांमध्ये सदर गावांना पाणी मिळाले नाही तर आपल्या कार्यालयामध्ये आंम्ही दि.२९ एप्रिल २०२६ रोजी ठिय्या आंदोलन करू याची नोंद घ्यावी. सदर आंदोलन प्रसंगी काही चुकीचे घडले किंवा काही कायदेशीर बाब उपस्थित झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
सदर गावांना पाणी मिळणार की २९ तारखेला ठिय्या आंदोलन होणार हे आता पहावे लागणार आहे.


