April 17, 2026
IMG-20260414-WA0046

करमाळा चौफेर (शंभू फरतडे✍️)

करमाळा तालुक्यातील ऐतिहासिक कंदर गावातील सुमारे ५०० वर्षे प्राचीन हेमाडपंथी शैलीतील महादेव मंदिर व प्रभू श्रीराम मंदिरासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा , अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गणेश जगताप यांनी पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे केली आहे. जगताप यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत मंत्री नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.टेंभुर्णी-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील कंदर हे ऐतिहासिक गाव आहे. येथे ५०० वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी शैलीतील भगवान महादेव मंदिर व प्रभू श्रीराम मंदिर आहे. प्रत्येक श्रावण सोमवार, महाशिवरात्री तसेच वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांप्रसंगी येथे हजारो भाविक गर्दी करतात. या मंदिरांसमवेत जोतिबा मंदिरही भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

कंदर गावाची आख्यायिका अशी आहे की श्रीरामांनी वनवास काळात येथे वास्तव्य केले होते आणि आजही येथे “सीतेची न्हाणी” म्हणून ओळखले जाणारे पुरातन स्थळ आहे. तसेच कण्वमुनी ऋषींचेही येथे वास्तव्य होते , असे सांगितले जाते. परंतु या धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांच्या आजूबाजूला कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.त्यामूळे मंदिरांची डागडुजी व संरक्षक संरचना,बाग-बगिचा व सौंदर्याकरण व या परिसरात बोटिंग सुविधा तसेच भाविकांसाठी विश्रामगृह व सभागृह,घाट व पायऱ्या,स्वागत कक्ष व माहिती केंद्र ,स्वच्छतागृहे व किचन शेड आदि कामे करण्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी केली जगताप यांनी केली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर असल्याने पर्यटनाला वाव

कंदर हे गाव टेंभुर्णी-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ आदी दक्षिणेकडील राज्यांमधून शिर्डीकडे जाणारे भाविक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. यामुळे या ठिकाणी पर्यटन वाढीस मोठा वाव असून, स्थानिकांना रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात असे जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.

मंत्र्यांचे तत्काळ निर्देश

प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी व भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत आवश्यक निधी मंजूर करावा, या मागणीची दखल घेत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *