●करमाळा चौफेर (शंभू फरतडे ✍️)●
करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या सामूहिक हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग १५१ आठवड्यांचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला असून, या निमित्ताने संपूर्ण तालुक्यात भक्तीचा अभूतपूर्व जल्लोष दिसून येत आहे.

सुरुवातीला केवळ तेरा भक्तांच्या उपस्थितीत सुरू झालेला हा उपक्रम आज भव्य स्वरूप धारण करून चाळीस पेक्षा अधिक गावांमध्ये पोहोचला आहे. दर शनिवारी पाचहजारांहून अधिक भक्त या उपक्रमात सहभागी होत असून, करमाळा तालुका भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघत आहे.
या यशामागे हिंदू समाजाची एकजूट आणि श्रद्धा हेच मुख्य बळ ठरले आहे. समाज एकत्र आल्यानेच हा उपक्रम इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढला व टिकला आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याने समाजात एकात्मता आणि धार्मिक संस्कार अधिक दृढ होत आहेत.

करमाळा शहरातील मारुती मंदिरात दर शनिवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे हा महाप्रसाद उपक्रमही १५१ आठवड्यांपासून अखंडपणे सुरू असून, भक्त मोठ्या भक्तिभावाने त्याचा लाभ घेत आहेत.
आज परिस्थिती अशी आहे की, हनुमान भक्तीची जणू लाटच सर्वत्र पसरली आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक मनात हनुमान नामाचा जयघोष घुमत आहे. प्रभू श्रीरामांच्या कृपेने सुरू असलेले हे कार्य भविष्यात आणखी व्यापक स्वरूप धारण करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला


