April 11, 2026
IMG-20260411-WA0030

 करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)

“एकाचवेळी शिंदे, बागल व गुळवेंना खुष करण्यासाठी विघ्ने यांना आमदारांना सवाल विचारावा लगात आहे असा टोला पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी लगावला आहे. आदिनाथ कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेवरून पाटील व शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना तळेकर यांनी करमाळा पंचायत समितीचे उपसभापती अजित विघ्ने यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे

अधिक बोलतान तळेकर म्हणाले की, अजित विघ्ने पूर्वी पाटील गटात होते व त्यांनी आमदार नारायण आबा पाटील यांची कार्यशैली जवळून पाहिली आहे. “केवळ आमदारांकडे फार्महाऊस, वैयक्तिक बोटी, खाजगी कारखाने आणि हॉटेलसारखी उत्पन्नाची साधने नसल्याने व ते भ्रष्टाचारापासून कोसो मैल दूर असल्याने विघ्नेंनी पाटील गटाला सोडचिठ्ठी दिली,” असा आरोप त्यांनी केला.

“आता उपसभापतीपद ज्यांच्या पाठिंब्यावर मिळाले त्या बागल गटास, ज्यांनी दिले त्या शिंदे गटास आणि ज्यांच्यामुळे निवडून आलेत त्या बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांना खुश करण्यासाठी विघ्ने आमदारांना सवाल करत आहेत,” तीघांना खुष करताना त्यांची दमछाक होत असल्याचे देखील तळकेर यांनी म्हटले आहे.

“आदिनाथला कर्जाच्या खाईत कोणी ढकलले याचा इत्थंभूत इतिहास विघ्नेंना ठाऊक आहे. हिमत दाखवुन आदिनाथ वर कर्जाचा डोंगर उभा करणाऱ्यांची नावे त्यांनी सांगितल्यास विघ्ने यांना लागलीच पदावरून पायउतार व्हावे लागेल. हीच त्यांची मजबुरी आहे,” असे तळेकर म्हणाले. भाडेपट्टा करार कोणाच्या काळात झाला व तिसऱ्या क्रमांकाचे टेंडर कोणाच्या नावाने होते, याची माहितीही विघ्नेंनी सभासदांना द्यावी, अशी मागणी तळेकर यांनी केली.

“माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी म्हैसगाव येथील विठ्ठल शुगरच्या माध्यमातून करमाळ्यातील शेतकऱ्यांना फसवून परस्पर कर्जे घेतली, या आरोपाचे खंडण उपसभापती कधी करणार?” असा सवाल तळेकरांनी केला. “विघ्नेंनी खरं तर या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात लढा द्यावा,” असा सल्ला द्यायलाही तळेकर विसरले नाहीत.

‘आदिनाथसाठी प्रयत्न सुरूअसुन योग्य वेळी भांडेफोड करू’

आदिनाथची उभारणी कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या त्यागातून झाली असल्याने आस्थेची बाब म्हणून आमदार नारायण आबा पाटील कारखाना संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कर्ज प्रकरण मंजुरीसाठी पाठवले असून राज्य शासनाची हमी बाकी आहे. “आमदार नारायण आबा पाटील हे सत्ताधारी नसल्याने त्यांना आर्थिक रसद मिळू नये म्हणून वरिष्ठ नेत्यांकडे कोण हेलपाटे मारत आहे, हे फार काळ लपुन राहणार नाही,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

“शिंदे गटाने आदिनाथबाबत ‘पुतणाबाईचा पान्हा’ दाखवणे थांबवावे. योग्य वेळी सभासदांसमोर भांडेफोड केली जाईल, तेव्हा विरोधकांना पळता भुई थोडी होईल,” असा सुचक इशारा तळेकर यांनी दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *