करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)
एनसीडीसीने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त केली असून सरफेसी कायद्यानुसार लिलावाची प्रक्रिया सुरू झाली असतानाही चेअरमन व संचालक मंडळ निद्रीस्त कसे, याचे खरे उत्तर पाटील गटाचे प्रवक्ते ‘ज्योतिष विशारद’ सुनील तळेकर यांनी द्यावे, असा घणाघाती सवाल करमाळा पंचायत समितीचे उपसभापती व शिंदे गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी केला आहे.
ॲड. विघ्ने म्हणाले की, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची सरफेसी ॲक्ट-2002 अंतर्गत जप्तीनंतर लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. एनसीडीसीने कारखान्याचा ताबा कायदेशीरपणे घेतला आहे. कर्जदार संस्थेने वेळेत कर्ज अदा न केल्यास आणि स्वारस्य न दाखवल्यास वित्तसंस्थेला नोटीस देऊन जप्ती व लिलाव करावा लागतो. आदिनाथची सत्ता पाटील गटाकडे असूनही कारखाना सुरू करण्यात ते अपयशी ठरले आहेत.
यापूर्वी दोन वेळा मुदत देऊनही विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने कर्ज परतफेडीबाबत कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळेच सरफेसी ॲक्टप्रमाणे जप्त मालमत्तेची विक्री लिलाव प्रक्रियेतून होत आहे. लिलावातून कारखाना खाजगी कंपनीच्या घशात घालण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप विघ्ने यांनी केला.


वस्तुतः बारामती ॲग्रोला भाडेपट्टा करिता विरोध करणारे लोकच आपला कारखाना खाजगी कंपनीच्या घशात घालण्याच्या तयारीला लागले आहेत, असा गंभीर आरोप विघ्ने यांनी केला. “सदरची कायदेशीर प्रक्रिया होईपर्यंत सत्ताधारी मंडळी निद्रीस्त कसे? याचे उत्तर तळेकरांनी द्यावे,” असे ते म्हणाले.
“आमचे नेते संजयमामा शिंदे यांचा म्हैसगावचा कारखाना खाजगी होता, तो आदिनाथप्रमाणे सहकारी नव्हता. त्यामुळे आदिनाथ रूपी सहकाराचे मंदिर कसे वाचवणार याबाबत बोला,” असे विघ्ने यांनी सुनावले. तळेकर जगताप गट, बागल गट, शिंदे गट संपणार अशी भाकिते करून जनतेचे मनोरंजन करतात, अशी टीकाही त्यांनी केली.

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचे नाव बदलून योजना होऊ देत नाही हे तळेकरांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. ती राबवायची असेल तर धरणात पाणी शिल्लक असणे आवश्यक आहे. धरणातील पाण्याचे वाटप पूर्वीच ठरले असल्याने नवीन योजनेला मंजुरी शक्य नाही. म्हणूनच संजयमामांनी कुकडीचे अपव्यय होणारे 8-10 टीएमसी पाणी उजनीत आणून दोन उपसा सिंचन योजना – केत्तुर ते चिलवडी आणि वाशिंबे-रिटेवाडी ते पोंधवडी – राबवण्याची अभ्यासपूर्ण मांडणी केली, असे विघ्ने यांनी सांगितले.
“तळेकरांनी स्वतःचे अपयश झाकण्यासाठी ज्योतिषाप्रमाणे भाकीत करणे बंद करून आदिनाथ कसा वाचवणार व तालुक्यातील विकासकामांबाबत भाष्य करावे,” असे आव्हान ॲड. अजित विघ्ने यांनी दिले.

