July 11, 2026
IMG-20260711-WA0036

करमाळा_चौफेर (केम प्रतिनीधी )

लोणावळा ते कर्जत दरम्यान जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे रेल्वे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे 10 जुलै ते 17 जुलै दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये केम स्टेशनवर थांबणाऱ्या हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस आणि दादर-सातारा एक्सप्रेसचाही समावेश आहे.या रद्द झालेल्या गाड्यांमुळे सकाळी पुणे-मुंबईला जाणाऱ्या केम आणि परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी केम ग्रामपंचायतीने हुतात्मा एक्सप्रेसला केम स्टेशनवर तात्पुरत्या स्वरूपाचा थांबा मिळावा अशी मागणी ठरावाद्वारे केली आहे.केम ग्रामपंचायतीने रेल्वे प्रबंधक, सोलापूर विभाग यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “केममधून पुणे-मुंबईला जाण्यासाठी सकाळी 6 वाजता हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस होती. त्यामुळे केम व आसपासच्या गावातील प्रवासी, व्यापारी आणि कुंकू कारखानदारांना या गाडीने सकाळी पुण्याला जाऊन संध्याकाळी परत येणे सोयीचे होते. अनेक प्रवासी या गाडीने पुण्याला अप-डाऊन करतात.”“सध्या केमधून सकाळी पुण्याला जाणारी एकही गाडी नाही. तसेच एसटीची पुरेशी सोय नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या परिस्थितीचा विचार करून हुतात्मा एक्सप्रेसला तात्पुरता थांबा देण्यात यावा,” अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.हे निवेदन केम रेल्वे स्टेशन मास्तर शेंडे साहेब यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी ते रेल्वे विभागाकडे पाठवून थांबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

यावेळी माजी सरपंच आकाश भोसले, सरपंच प्रतिनिधी राहुल आबा कोरे, तिकीट बुकिंग प्रतिनिधी अर्जुन अवघडे, प्रवासी संघटनेचे राहुल रामदासी, बापू केंगार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *