करमाळा_चौफेर
करमाळा तालुक्यातील मांगी तलावातून जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील कृषी महाविद्यालयास पाणी देण्याचा निर्णय हा पूर्णपणे मंत्रालयीन स्तरावर घेण्यात आला आहे. कुकडी प्रकल्पात मांगी तलावाचा समावेश नसल्याने कुकडी सल्लागार समितीच्या बैठकीत हा विषय आला नव्हता, अशी माहिती आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.
मांगी तलावावर अवलंबून असलेल्या १८ गावांतील शेतकरी व पाणी वापर संस्थांच्या बाजूने आमदार नारायण आबा पाटील हे पावसाळी अधिवेशनात सभागृहात प्रश्न मांडणार आहेत. बोरगावसह ८ गावे पाणीपुरवठा योजना, मांगी, उत्तर वडगाव, दक्षिण वडगाव, हिवरवाडी, जातेगाव, रावगाव येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी राखीव ठेवण्याची मागणी ते करणार आहेत.
●करारात काय अटी?●
तळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटबंधारे विभाग व कृषी महाविद्यालय यांच्यातील पाणीपुरवठा करार हा 6 वर्षांसाठी आहे. हा पुरवठा कायमस्वरूपी नसून करारातील अट क्र. 22 नुसार ही मंजुरी पाणीपुरवठ्याची हमी नाही. नैसर्गिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे तलावात पाणी कमी पडल्यास मंजूर पुरवठ्यात कपात करण्याचा अधिकार कार्यकारी अभियंत्यांना असेल. त्यामुळे महाविद्यालयाच्या कोणत्याही नुकसानीची जबाबदारी शासन घेणार नाही. पाणी कोटा कमी करणे, कराराचे नुतनीकरण, नावात बदल याचे अधिकार पाटबंधारे विभागाकडेच राहतील. हा निर्णय घेताना पाणी स्थानिक वापर संस्था व ग्रामपंचायतींना विश्वासात घ्यायला हवे होते, असे तळेकर म्हणाले.
उजनीचे पाणी मांगीत आणण्यासाठी प्रयत्नशील
मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश करावा यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांनी यापूर्वीच मागणी केली होती. तसेच नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेतून उजनीतून कायमस्वरूपी पाणी मांगी तलावात आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे शासनाने आधी या मागण्यांचा विचार करावा या भूमिकेवर आमदार ठाम आहेत, असे तळेकर यांनी स्पष्ट केले.
मांगी तलाव व उत्तर भागातील कुकडी लाभक्षेत्रातील सर्वच तलावांत उजनीचे पाणी आणण्यासाठी रिटेवाडी उपसा योजना कार्यान्वित करण्याचा आबांचा संकल्प आहे. शेतकरी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचे पाटील गटाकडून सांगण्यात आले.
