करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)
करमाळा तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ आता पर्यंत विद्यमान आमदार नारायण आबा पाटील व दिग्विजय बागल यांनी बैठका घेतल्या. उद्या 4 मे रोजी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे याच प्रश्नावर बैठक घेत आहेत. वास्तविक पाहता आमदार या नात्याने व जबाबदारीतून आमदार नारायण आबा पाटील यांनी रितसर बैठक घेऊन प्रशासनास योग्य त्या सूचना व आदेश दिल्यानंतर आता प्रशासनही अधिक गतिमान झाले होते. परंतु बागल गट व मोहिते पाटील गटाकडून बैठका एकाच विषयावर समांतर बैठका निश्चितच प्रशासनही संभ्रमावस्थेत पोहचणार हे निश्चित आहे.
खरं तर पाणी टंचाई हे एक निमित्त आहे. यामागे अनेक कारणे दडलेली आहेत. आणि ही सगळी कारणे राजकीय अस्तित्वाशी निगडीत आहेत. या बैठकीस राजकीय स्वरूप का आले आहे? व उद्याच्या बैठकीत नेमकं काय घडू शकतं, जर तर च्या अंदाजावर घेतलेला सविस्तर आढावा कारणांसह वाचकांसमोर मांडत आहोत.
१) विधानसभा निवडणुकीनंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. यात आमदार नारायण आबा पाटील यांच्या पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. परंतु यानंतरच खरे राजकारण सुरू झाले. आदिनाथला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आमदार पाटील यांना सत्ताधारी पक्षाचे उंबरठे झिजवणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. दोन वेळा आदिनाथवर आलेली जप्तीची नोटीस रद्द करून पुढे ढकलण्यात त्यांना यशही आले.
२ ) आदीनाथ नंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आल्या. आमदार पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार उतरवणार हे निश्चित झाले असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अपक्ष लढण्याची अट घातली .त्या अटीचे पालन करत आमदार पाटील यांनी स्वतःच्या नोंदणीकृत पक्षाकडून सर्व उमेदवार उभे केले
३) राष्ट्रवादी श प पक्षा बरोबरच नारायण पाटील यांनी मोहिते-पाटील गटाशी पूर्ण फारकत घेतली, जर आमदार पाटील हे मोहिते पाटील गटाशी सलगी अथवा युती करून राहिले असते तर वरिष्ठ पातळीवर आदिनाथ बाबत मदत मिळणे अवघड झाले असते. यामुळे मग ज्या ठिकाणी मोहिते पाटील यांची उपस्थिती असेल अशा कार्यक्रमांना जाणे आमदार नारायण आबा पाटील यांनी पूर्णपणे टाळले
४ )दरम्यानच्या काळात अनेकदा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेऊन विश्वास संपादन केला. आता विधानपरिषदेची निवडणूक पार पडली. मोहिते पाटील यांना सर्वच पक्षांनी दूर करत उमेदवारी दिली नसल्याने आता राज्याच्या सभागृहात पहिल्यांदाच मोहिते पाटील कुटुंबातील एकही सदस्य नसणार आहे.त्यातच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद यावर सत्ता स्थापन करून मोहिते पाटील यांच्या राजकीय अस्तित्वास सुरुंग लावला आहे. यामुळे मग मोहिते पाटील यांच्याकडून परत एकदा जिल्ह्यात राजकीय मोट बांधणे सुरू झाले आहे. अशातच माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यातील भेटी वाढवल्या आहेत. यातूनच उद्याची पाणी टंचाई बैठक आयोजित करण्यात आली आहे.अशी चर्चा आहे.
५ ) बागल-शिंदे गट हजर राहणार का?: एकीकडे मोहिते पाटील यांच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यात विरोधकांची मोट बांधण्यात यशस्वी ठरलेले माजी आमदार संजयमामा शिंदे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विश्वासू अशा जि.प. गटनेत्या रश्मी बागल यांच्या ताब्यात पंचायत समितीची सत्ता आहे. पाणी टंचाईशी निगडीत विभाग पंचायत समितीच्या अधिपत्याखाली काम करतात. यामुळे मग बागल व शिंदे गटाचे पदाधिकारी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस उपस्थित राहणार का? जर उपस्थित राहिले तर सोलापूर जिल्ह्यात कोणता संदेश जाणार?
६ )सध्या नारायण पाटील देखील पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार काम करतान दिसत आहेत.त्यामूळे आमदार नारायण आबा पाटील किंवा त्यांचे समर्थक पदाधिकारी उद्या काय भुमिका घेणार व सतत पाटील गटावरील राजकीय संकटास आपल्या खास शैलीत विरोधकांना नामोहरम करत वेगळीकडे विषय घेऊन जाणारे पाटील गटाचे प्रवक्ते आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर देखील बागल गटासारखी टीका करणार का? हे देखील पहाणे महत्वाचे आहे.
७) शिंदे गटाची कोंडी – एरव्ही नारायण पाटील हे मोहिते पाटील समर्थक आहेत म्हणून आमदार पाटील यांना यापूर्वी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे पदाधिकारी आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याच बैठकीला हजर राहणार का? तसेच एरव्ही मोहिते पाटील यांचे आपल्या लिखाणातून सतत वाभाडे काढून माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सोलापूर जिल्ह्यातील नेतृत्वाची जाणीव नागरिकांना करून देणारे शिंदे गटाचे मार्गदर्शक विवेक (अण्णा) येवले हे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठकीवर व्यक्त होणार का?
७) -)बागल गटाची भुमिका व पूजाताई ढेरे यांची कसोटी
या बैठकीवर बागल गटाची भुमिका काय असणार हे गुलदस्त्यात आहे त्यामुळेच अजून पदभार स्वीकारून अनुभव घेऊ पाहणाऱ्या सभापती पूजाताई ढेरे आता एकंदरीतच या घटनांतून कोणते प्रशासकीय अनुभव घेणार हे पहाणे देखील औत्सुक्याचे असणार आहे.
८) प्रशासनाची गोची -अगोदरच गोंधळून गेलेले पंचायत समिती व महसूल तसेच पाणी पुरवठा व कृषी विभाग आता कोणाच्या सूचनांचे पालन करून पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करणार?
9) जयवंतराव जगताप येणार का? मोहिते पाटील यांच्यापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दूर गेलेले माजी आमदार जयवंतराव जगताप हे या बैठकीस येणार का किंवा खासदार धैर्यशील मोहिते पाटील स्वतःहून निमंत्रण देऊन बैठकीस उपस्थित राहायला भाग पाडणार का?याची सुद्धा चर्चा आहे.
१० )तालुक्यातील पाणीटंचाई चा प्रश्न असल्याने बागल, शिंदे व पाटील गटाचे सर्व सदस्य उपस्थित रहाणार का राजकीय मुद्दा झाल्याने मोहिते-पाटील यांच्या बैठकीचे महत्व कमी करण्यासाठी गैरहजर रहणार या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला उद्याच्या बैठकीनंतरच मिळतील.तूर्तास करमाळा तालुक्यातील उन्हाचा पारा वाढलेला असताना आता राजकीय तापमानातही विक्रमी वाढ होणार असेच चित्र सध्या तरी आहे.
पाणीटंचाई वर तिन आमदार, पंचायत समिती ,खासदार यांनी बैठका घेतल्यानंतर तरी हातपंप दुरूस्ती, टँकर या गोष्टींची जलद पूर्तता व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे.”पाणी कुणाला मिळेल माहीत नाही, पण राजकीय ‘तहान’ भागवण्याचा प्र यत्न होवू नये इतकेच!
