करमाळा_चौफेर (✍🏻शंभू फरतडे)
करमाळा मतदार संघातील शेती पंपासाठी आठ तास वीजपुरवठा मिळावा अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना आज आमदार नारायण आबा पाटील यांनी विधानभवन पॅसेजमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वीजेच्या प्रश्नाबाबत असलेली तीव्र नाराजी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाला सूचना देणार असल्याचे सांगितले.
निवेदनात आमदार नारायण आबा पाटील यांनी नमूद केले की करमाळा तालुक्यातील उजनी, भीमा-सीना जोडकालवा, सीना-कोळगाव, मांगी तलाव तसेच विहीर व कूपनलिका असलेल्या भागात वीजेची कपात झाल्याने केळी, ऊस, डाळिंब यांसारखी नगदी पिके जळून चालली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. उजनीत पाण्याचा विसर्ग वाढला असला तरी वीजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही.
राज्यात इतरत्र चांगला पाऊस झाला असला तरी करमाळा मतदार संघातील अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतातील उभी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मेहनत करावी लागत आहे. शेती पंपाला वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतीपूरक व्यवसायही धोक्यात आले आहेत. विशेषतः दूध संकलनावर याचा गंभीर परिणाम झाला आहे.
शेती पंपाशिवाय घरगुती वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासापासून वंचित रहावे लागत आहे. यापूर्वी उजनीचा पाणी साठा मायनसमध्ये गेल्याने पिण्याचे पाणी राखण्यासाठी वीज कपात केली होती. परंतु आता उजनीची पातळी प्लसमध्ये आल्याने शेतकऱ्यांना तात्काळ आठ तास वीज द्यावी अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली आहे.
