करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍🏻)
करमाळा तालुक्यातील मांगी तलाव लाभक्षेत्रासह लाभक्षेत्राबाहेरील विहीर, बोअरवेल व शेततळ्यांवरील शेतीपंपांचा वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता आठ तासांवरून केवळ दोन तास करण्यात आल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी अमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते.चार तास वीज उपलब्ध झाल्या शिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. अखेर शेतकऱ्यांच्या अक्रमक भुमिके पुढे महावितरण ला नमते घ्यावे लागले असून लेखी आश्वासन दिल्यानंतर चार दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले.
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन यांच्या आदेशाने व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि उपस्थित मान्यवरांच्या मध्यस्थीने हा निर्णय घेण्यात आला.
वडगाव दक्षिण येथील संदीप काळे व विकास गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सोमवारपासून करमाळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. गुरुवार दि. १ ऑक्टोबर रोजी उपोषणाच्या चौथ्या दिवशी महावितरण कडून आपल्या मागणीचे लेखी आश्वासन घेऊन मांगी तलाव लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने उपोषणकर्त्यांचा हार, शाल, श्रीफळ देऊन वडगांव येथे सन्मान करण्यात आला.
मांगी तलाव परिसरातील वीजपुरवठा जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या आदेशानुसार दोन तास करण्यात आला होता. परंतु या उपोषणानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या आदेशाने मांगी तलाव लाभ क्षेत्रातील शेतीपंपाचा वीजपुरवठा १५ ऑक्टोबर पर्यंत दोन तासावरून चार तास करण्यात आला आहे. तसेच मांगी तलावावरील ११ केव्ही भोसे लाईन व ११ केव्ही पुनवर लाईनची शाखाधिकाऱ्यांनी पाहणी केली असून मांगी तलाव परिसरातील रोहित्रे बंद करण्यासाठी कार्यकारी अभियंता, बार्शी यांच्या आदेशानुसार तलाव परिसरातील एबी स्विचचे काम दोन दिवसांत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर तलाव परिसर सोडून तलावाबाहेरील रोहित्रांचा वीजपुरवठा महावितरणच्या नियमानुसार सुरळीत केला जाईल, असे लेखी आश्वासन उपकार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे.
या लेखी आश्वासनानंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन संदीप काळे व विकास गायकवाड यांचे उपोषण सोडवण्यात आले. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता बारगळ साहेब, झुंजकर साहेब, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल तसेच मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
●४ तास वीज पुरवठा व दोन दिवसांत एबी स्विचचे काम करण्याचे आश्वासन●
मांगी तलाव लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा १५ ऑक्टोबर पर्यंत दोन तासावरून चार तास करणे. तसेच मांगी तलाव परिसरातील रोहित्रे बंद करण्यासाठी आवश्यक असलेल्या एबी स्विचचे काम दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर तलाव परिसराच्या बाहेरील रोहित्रांचा वीजपुरवठा महावितरणच्या नियमानुसार सुरळीत करण्यात येईल, असे महावितरणने लेखी दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले आहे.
