August 22, 2026
IMG-20260822-WA0070

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)

तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये उतारे, नकाशे व इतर महत्त्वाची कागदपत्रे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त झाल्या आहेत.अनेक शेतकरी आपल्या जमिनीचे नकाशे, उतारे व इतर अभिलेख मिळविण्यासाठी अनेक दिवसांपासून कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. मात्र, संबंधित कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविले जात असल्याचा आरोप आहे. तसेच कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी अरेरावीच्या भाषेत बोलले जात असल्याच्या तक्रारीही शेतकऱ्यांनी केल्या आहेत.याशिवाय भूमी अभिलेख कार्यालयाच्या परिसरात खाजगी एजंटांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पैसे दिल्यास काम लवकर होते, अन्यथा कामासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागते, अशा गंभीर तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या सर्व प्रकाराची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.●मनसेचे शेतकऱ्यांना आवाहन●

करमाळा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयातून नकाशे, उतारे किंवा इतर कागदपत्रे मिळविण्यास अडचण येत आहे, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुकाध्यक्ष मा. संजय (बापू) घोलप यांच्याशी संपर्क साधावा. मो.9011148077 तसेच कार्यालयात कागदपत्रे उपलब्ध नसतील तर संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी मागणी करून “सदर नकाशे/उतारे आढळून येत नाहीत” असे लेखी स्वरूपात देण्याची मागणी करावी. यामुळे शेतकऱ्यांच्या कामाचा अधिकृत लेखी पुरावा उपलब्ध राहील असे देखील म्हटले आहे.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि शासकीय कार्यालयातील गैरप्रकारांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे असे तालुकाप्रमुख संजय बापू घोलप यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *