July 5, 2026
IMG-20260705-WA0019(1)

करमाळा_चौफेर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या एल.एल.एम. सीईटी.-2026 च्या प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात त्रुटी झाल्याचा आरोप करत युवासेना महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव तथा विद्यापीठ सिनेट सदस्या अ‍ॅड. उषा नंदकुमार पवार यांनी कुलगुरूंना निवेदन सादर केले आहे. प्रवेश प्रक्रियेस तात्काळ स्थगिती देऊन सर्व पात्र विद्यार्थ्यांना समान न्याय द्यावा, अन्यथा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे,निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, एल.एल.एम. सीईटी.-2026 परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देता आली नव्हती. त्याची दखल घेत विद्यापीठाने विद्यार्थीहितासाठी अतिरिक्त संधी देऊन स्वतंत्र दिवशी पुन्हा परीक्षा घेतली. मात्र निकालानंतर सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये केवळ पहिल्या टप्प्यात परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचाच विचार करण्यात आला. विद्यापीठाने स्वतः दिलेल्या दुसऱ्या संधीअंतर्गत परीक्षा दिलेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेपासून पूर्णपणे वगळण्यात आले.अ‍ॅड. पवार म्हणाल्या, “विद्यापीठाने स्वतः दिलेल्या संधीचा लाभ घेऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवणे हे नैसर्गिक न्याय आणि समानतेच्या तत्त्वांचा भंग आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ही केवळ आश्वासनापुरती मर्यादित राहिली.” सध्या सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या त्रुटीपूर्ण व विद्यार्थीहितास बाधक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.सध्या सुरू असलेल्या एल.एल.एम. प्रवेश प्रक्रियेस तात्काळ स्थगिती द्यावी, सर्व पात्र विद्यार्थ्यांचा समान व न्याय्य विचार करून कायदेशीर पद्धतीने नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवावी अन्यथा अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेकायदेशीर प्रशासकीय कारभाराच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन व निदर्शने करू असे पवार यांनी स्पष्ट केले आहे व यास संपूर्णपणे विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील असे म्हटले आहे. अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांनी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे 7840962293अ‍ॅड. उषा पवार या युवासेना महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव असून सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य देखील आहेत. त्यामुळे या प्रकरणाने विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *