करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍🏻 )
करमाळा तालुक्याच्या दुष्काळी भागातील २२ गावांची तहान भागवणाऱ्या मांगी तलावातील पाणी हाळगाव येथील कृषी महाविद्यालयाला देण्याचा शासन निर्णय झाला आहे. या निर्णयाविरोधात मांगी तलाव लाभक्षेत्रातील २२ गावांतील शेतकरी व ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत. “रक्त सांडायची वेळ आली तरी आम्ही मांगी तलावातील एक थेंबही बाहेर तालुक्यात नेऊ देणार नाही” असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.
या आंदोलनासाठी २२ गावांतील ग्रामपंचायतींमध्ये ठराव घेण्यात आला आहे. “आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार” या म्हणीप्रमाणे मांगीतला हा पूर्ण पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यापूर्वी कोणत्याही सरकारने मांगीतला पाणी आणण्यासाठी पाऊल उचलले नाही. साधारण १ TMC क्षमतेचा हा तलाव गेली ५५ वर्षांमध्ये फक्त ८ ते १० वेळा ओव्हरफ्लो झाला आहे. म्हणजे फक्त पावसावर अवलंबून असणारा हा तलाव पावसाळ्याच्या चार महिन्यात भरतो आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरडा होतो.
मांगी तलाव लाभक्षेत्रासह १२ गावांची बोरगाव पाणी पुरवठा योजना गेली कित्येक वर्षापासून बंद आहे. दरवर्षी साधारण पावसाळ्यामध्ये जेमतेम ५० ते ६$ टक्के पाणी या तलावामध्ये जमा होते. त्यातच तलावात २०% गाळ असल्यामुळे दोन अडीच महिन्यातच तलाव पूर्ण कोरडा होतो. त्यामुळे या भागात गेले काही वर्ष सोडले तर पाण्याची तीव्र टंचाई जाणवते.
या सर्व गोष्टींचा शासनाने विचार करावा व ताबडतोब हा निर्णय मागे घेण्यात यावा. किंवा मांगीतलाव हा कुकडी लाभक्षेत्रामध्ये वर्ग करून मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी आणण्याची व्यवस्था करावी, या मागणीसाठी उद्या सोमवार दिनांक २२ जून रोजी टेंभुर्णी-नगर हायवे ला मांगी बस स्थानकाजवळ हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तसे अधिकृत परवानगी घेण्यात आलेली आहे. तरी या आंदोलनासाठी २२ गावांतील शेतकरी बांधव तसेच ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मांगी तलाव पाणी बचाव संघर्ष समितीने केले आहे.
