करमाळा_चौफेर
लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त करमाळा आगारात रविवारी उत्साहाचे वातावरण होते. बससमोर नारळ फोडून व केक कापून “लालपरी”चा ७८वा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. याचवेळी प्रवाशांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी बसस्थानक परिसरात मोफत वाचनालयाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले.
करमाळा बसस्थानक परिसरात सुरू करण्यात आलेल्या या मोफत वाचनालयाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमामुळे बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना आता प्रतीक्षेच्या कालावधीत विविध पुस्तके, दैनिक वृत्तपत्रे व मासिकांचे वाचन करता येणार आहे. “प्रवासासोबत ज्ञानप्रवास” ही संकल्पना राबवणाऱ्या करमाळा आगाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमात आगारातील विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा प्रत्येकी रु. 1,500/- रोख रक्कम देऊन विशेष सत्कार करण्यात आला. “प्रवासी देवो भव:” हे ब्रीद जपत लाखो प्रवाशांना सुरक्षितपणे घरी पोहोचवणाऱ्या या ‘रस्त्यावरील देवदूतांचा मान्यवरांनी गौरव केला. त्यांच्या जबाबदार व सुरक्षित सेवेबद्दल टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यश कल्याण समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश करे पाटील, श्री बाबुराव हिरडे तसेच गोरे गुरूजी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा आगाराचे आगार व्यवस्थापक श्री शिवाजी कानडे होते.
यावेळी मान्यवरांनी एसटीच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करताना प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार व वेळेवर सेवा देण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने कार्यरत राहावे,असे आवाहन केले. “एसटी ही फक्त बस नाही, तर ती ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे” असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.
कार्यक्रमास आगारातील अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करमाळा आगाराच्या वतीने करण्यात आले.
