करमाळा_चौफेर
करमाळा तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी व स्थानिक रोजगार निर्मितीसाठी तसेच कृषी विकासाला चालना देण्यासाठी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंभुराजे जगताप यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात शंभूराजे जगताप यांनी म्हटले आहे की करमाळा येथील मांगी MIDC मध्ये बहुतांश भूखंडांची विक्री होऊनही पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने औद्योगिक विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. यावर ‘मांगी धरण’ येथून थेट MIDC क्षेत्रासाठी विशेष पाणी पुरवठा पाईपलाईन योजना तातडीने मंजूर करून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय, शहरातील MIDC अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्याने जड वाहतुकीसाठी काँक्रिटीकरण व डांबरीकरणासाठी स्वतंत्र रस्ते निधी मंजूर करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
करमाळा तालुका ऊस व केळी उत्पादनात आघाडीवर असल्याने कच्च्या मालावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया होण्यासाठी स्वतंत्र ‘ॲग्रो-बेस्ड इंडस्ट्री’ मॉडेलचा प्रस्ताव दिला आहे. यात केळीपासून वेफर्स, पावडर, फायबर बनवणाऱ्या अन्न प्रक्रिया उद्योगांना विशेष सबसिडी, निर्यातीसाठी अद्ययावत कोल्ड स्टोरेज व पॅकेजिंग हाऊस, ऊसाच्या चिपाडापासून कागद व इथेनॉल निर्मिती करणाऱ्या लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे.तसेच ग्रामीण महिलांसाठी गारमेंट क्लस्टर्स सुरू करावेत.असे देखील सुचीत केले आहे.
तालुक्यात येणाऱ्या सर्व नवीन उद्योगांमध्ये ८०% रोजगार स्थानिक भूमिपुत्रांनाच देणे बंधनकारक करावे आणि त्यासाठी विशेष कौशल्य विकास केंद्र सुरू करावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. उद्योगमंत्री यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक चौकशी व तातडीच्या बैठकीचे आश्वासन दिले आहे.
माजी आमदार कृषी उत्पन्न बाजार समतीचे सभापती जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळेस बाजार समितीचे संचालक, आजी माजी नगरसेवक शिवसेना पदाधिकरी उपस्थित होते
