करमाळा चौफेर
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या लिलावाच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सुभाष गुळवे आणि तळेकर यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला असून, दोन्ही गटांनी मुलाखतींतून एकमेकांवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. या वादात आ. नारायण पाटील, माजी आ. संजयमामा शिंदे, रोहित पवार आणि दिग्विजय बागल यांची नावेही ओढली गेली आहेत.
आदिनाथचा लिलाव न झाल्याने “माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे कोकणी देव पाण्यातच राहिले” अशी बोचरी टीका तळेकर यांनी केली. यावेळी त्यांनी सुभाष गुळवे यांच्यावरही निशाणा साधला होता, या बाबत स्थानिक पत्रकारांनी संपर्क साधला असता सुभाष गुळवे म्हणाले, “आ. पाटील यांच्या ताब्यात आदिनाथ आल्यानंतरही तो सुरू करू शकले नाहीत. कारखान्याचा लिलाव ४ जूनपर्यंत लांबणीवर पडला आहे. नियोजन न झाल्यास लिलाव अटळ आहे.” तसेच “सोन्याचा धूर काढू, असे प्रचारा दरम्यान आमदार सांगत होते. मग कारखाना का सुरू होत नाही? या लिलावामागे आमदार नारायण पाटील आर्थिक हित साधत आहेत,” असा थेट आरोप गुळवे यांनी केला.
गुळवेंच्या आर्थिक हितसंबंधाच्या आरोपाने दुखावलेल्या पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांनी तात्काळ मुलाखत देऊन आरोपांचे खंडन केले. त्यांनी उलट गुळवेंवर गंभीर आरोप केले तळेकर यांनी म्हटले आहे की “सुभाष गुळवे व संजयमामा शिंदे यांनी आदिनाथचे संचालक कोर्टात जाण्यासाठी बागल प्रणित आदिनाथ कारखान्याच्या संचालक मंडळास २५ लाख रुपयांची मदत केली. मोलॅसिस पोटी ॲडव्हान्स दाखवून १० लाख व रोख १५ लाख रुपये दिले.”
गुळवे व संजयमामा हेच रोहित पवार यांना फसवत असून, त्यांना पार्टनरशिपमध्ये आदिनाथ चालवायचा होता. रोहित पवार व दिग्विजय बागल यांच्यातही लिलावाच्या कमिशनवरून शाब्दिक खडाजंगी झाली आहे,” खळबळजनक असा गौप्यस्फोट तळेकर यांनी केला.
वास्तविक पाहता आदिनाथ कारखान्याच्या बारामती एग्रो बरोबरच्या कराराची मुदत का वाढवली गेली आणि बागल यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ कोर्टात का गेले या दोन्ही प्रश्नांची उत्तरे ही मुळ करार सभासदांच्या समोर उघड झाल्यानंतरच समजतील. तो पर्यंत हे केवळ आरोप प्रत्यारोप राहतील.
एकीकडे आदिनाथ कारखाना सुरू होऊन धूर कधी निघणार हे सांगणे कठीण असताना, सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या वाफा मात्र भरपूर निघत असल्याने लोकांसाठी आदिनाथ हा करमणुकीचा विषय बनू लागला आहे,परंतू तसे पाहिले तर बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वर केलेले आरोप जितके गंभीर आहेत तितकेच गंभीर आरोप पाटील गटाकडून तळेकर यांनी सुभाष गुळवे व माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वर केलेले आहेत. या आरोपामागील तथ्य अथवा सत्य सभासदांच्या समोर आलेही पाहिजे याबद्दल कोणाचेही दुमत नाही.
“आदिनाथबद्दल खरोखर आस्था असेल, तर सर्व नेत्यांनी राजकीय वाद बाजूला ठेवून एकत्र येऊन कारखाना सुरू करावा,” अशी कळकळीची मागणी शेतकरी सभासद करू लागले आहेत.
तर पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आदिनाथ संचालक मंडळाच्या परवा झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीचा दाखला देत यंदाचा गळीत हंगाम सुरू केला जाणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
जूनपर्यंत लिलाव लांबणीवर पडला असून, तोपर्यंत नियोजन न झाल्यास लिलाव अटळ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस करमाळ्याचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत
