करमाळा_चौफेर
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा लिलाव व्हावा अशी इच्छा मनात बाळगून २२ मे दिवशी कोकणी देव पाण्यात ठेऊन बसलेल्या माजी आमदार संजयमामांचे इच्छा शेवटी अपुरीच राहीली असल्याचा टोला आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी लगावला. २२ मे रोजी आदिनाथ कारखान्याच्या लिलावा होणार संदर्भात वर्तमानपत्रातुन नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. या नोटीशीचे भांडवल करुन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या वर टिका केली होती.
यानंतर लिलाव स्थगित होताच आता आमदार पाटील गट आक्रमक झाला असून पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी माजी आमदार संजयमामा शिंदे व बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्यावर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा विधानसभा निवडणुकी पाठोपाठ आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतही आमदार नारायण आबा पाटील यांनी पराभव केला. ही बाब माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या जिव्हारी लागली होती. यातुनच ते सतत आदिनाथ विकला जाणार, आदिनाथवर जप्ती येणार, आदिनाथ लिलावात निघणार अशी वक्तव्ये जाहीर सभांमधून छातीठोकपणे करत होते. दिनांक २२ मे रोजी आदिनाथ कारखाना सरफेसी कायद्यान्वये लिलावात निघणार हे सांगून माजी आमदार संजयमामा शिंदे व उपसभापती अजित विघ्ने यांच्या तोंडाला फेस आला होता.परंतु या अगोदरही दोन वेळा नोटीसा निघूनही लिलाव प्रक्रिया झाली नाही आणि २२ मे रोजी सुध्दा लिलावाची प्रक्रिया झाली नाही. यामुळे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्याबाबत वाईट चिंतने सोडुन द्यावे असा इशारा तळेकर यांनी दिला आहे.
आदिनाथ कारखाना व एग्रोचा भाडेपट्टी करार होत असताना व झाल्यावरही माजी आमदार संजयमामा शिंदे, बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे आणि तालुक्यातील एक युवानेता यांच्या मध्ये एक कटकारस्थान शिजले होते. आदिनाथच्या ३२ हजार सभासदांचा विश्वासघात करुन स्वतःच्या स्वार्थापोटी या त्रिकुटाने आखलेला डाव सभासदांच्या समोर लवकरच आणला जाईल. याबाबत अधिक पुरावे पाटील गटाच्या हाती लागले असुन लवकरच भांडेफोड केली जाणार असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले. त्यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे करमाळा तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

