करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)
मिरगव्हाण ते कोंढेज (प्रजिमा) करमाळा मार्गावरील वार्षिक (2025/26) देखभाल व दुरुस्तीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याने सर्वसामान्य नागरिकांना तीव्र समस्यांचा सामना करावा लागतं होता, प्रामुख्याने हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून, विशेषतः मिरगव्हाण हे तालुक्यातील शेवटचे गाव आहे, हा परिसर ऊस उत्पादक पट्टा असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जाते. मात्र रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहनचालक, विध्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
रस्त्यावरील खड्डे व खराब झालेल्या मार्गामुळे अपघाताचा धोका वाढला होता. खराब रस्त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती, गेल्या सहा महिन्यांपासून विविध प्रशासकीय स्तरांवर घरबुडे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
महेश घरबुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदाराकडून कामात होत असलेल्या विलंबाबाबत वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कार्यवाही होत नव्हती. अखेर पुणे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कार्यालयात जाऊन या प्रश्नावर तीव्र आवाज उठवण्यात आला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी करमाळा विभागाशी तात्काळ संपर्क साधून कामात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध अनामत रक्कम जप्त करणे तसेच काळ्या यादीत समाविष्ट करण्याबाबत निर्देश दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराने कामं चालु केलं आहे.
या प्रशासकीय हस्तक्षेपानंतर रखडलेल्या कामाला गती मिळाल्याचे दिसून येत आहे. मात्र एवढ्या दुरुस्तीच्या कामासाठी सहा-सहा महिने व पुणे विभागीय कार्यालयापर्यंत जाऊन पाठपुरावा करावा लागणे ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
“गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करत होतो. अखेर प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेतली आहे. हा रस्ता दर्जेदार पद्धतीने आणि तातडीने पूर्ण व्हावा, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल,” -(महेश घरबुडे, ग्रामस्थ प्रतिनिधी)
