करमाळा_चौफेर शंभू फरतडे
4 मे रोजी करमाळा येथे पार पडलेल्या पाणी टंचाई निवारण बैठकीत जि.प. गटनेत्या रश्मी बागल व पं.स. सदस्य भरत आवताडे यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेवरून पाटबंधारे अधिकारी राजगुरु यांना धारेवर धरले होते. यावर आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी तीव्र हल्लाबोलकेला आहे.
‘बागल कुटुंबाने 17 वर्षे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम जाणीवपूर्वक रखडवले होते.या योजनेच्या केवळ काही ठिकाणी चाऱ्या खोदून ठेवल्या व चालू वर्षी पाणी येईल अशी खोटी आशा शेतकऱ्यांना दाखवत विधानसभेच्या दोन टर्म, आदिनाथच्या तीन टर्म व जि.प.-पं.स.च्या तीन टर्म निवडणुकांमध्ये मते घेतली. शेवटी शेतकऱ्यांना बागल कुटुंब हे दहिगाव उपसा योजनेचा वापर केवळ सत्ता मिळवण्यासाठी करत आहेत हे लक्षात आले. म्हणून 2014 मध्ये शेतकऱ्यांनी आमदार म्हणून नारायण आबा पाटील यांना निवडून दिले’ असे तळेकर म्हणाले.
‘आमदार नारायण आबा पाटील यांनी दोन वर्षांतच या योजनेला निधी मंजूर करून व जमीनस्तरावर स्वतः लक्ष देऊन काम पूर्ण करून घेतले व योजना कार्यान्वित केली.
यामुळे करमाळा तालुक्यातील पूर्व भाग ओलिताखाली आला आता रश्मी बागल यांनी सर्वात प्रथम 17 वर्षे योजना रखडली गेली याबद्दल शेतकऱ्यांची माफी मागावी आणि नंतरच त्यांना न्याय देण्याच्या गोष्टी कराव्यात’, असा टोला तळेकरांनी लगावला.
‘माजी आमदार संजयमामा शिंदे यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना या योजनेचे गांभीर्य नाही व योजनेबद्दल जादा माहितीही नाही. मी बेकायदेशीर कामे करत नाही असे सांगून वडशिवणे तलावात पाणी न सोडणाऱ्या संजयमामा शिंदे यांना दहिगाव उपसावर बोलण्याचा अधिकार नाही’ असा आरोप तळेकरांनी केला.
‘उन्हाळी आवर्तन प्रकारच नाही :
तळेकर म्हणाले, ‘सध्या केवळ मुख्य कॅनालद्वारे पाणी दिले जाताना इतर उपचाऱ्यांमधून पाणी देत असताना शेतकऱ्यांकडून अडवणूक केली जाते. तीन महिन्यांहून अधिक काळ पूर्व भागात पाणी चालू असून जिथे पिकांच्या अडचणी नसतील अशा सर्व ठिकाणी पाणी दिले गेले आहे. जवळपास 18 गावांमध्ये पाणी दिले गेले आहे. उर्वरित ठिकाणी बंद पाईपलाईनचे काम चालू असल्याने पाणी दिले तर पाईपमध्ये गाळ अडकला जाऊ शकतो.वास्तविक पाहता नियमानुसार उन्हाळी आवर्तन हा प्रकारच नाही परंतु आमदार आबा पाटील यांनी कालवा सल्लागार समितीमध्ये आग्रही मागणी केल्यानंतर हे आवर्तन जिथे शक्य तिथे पाणी पोहचवत आहोत
‘आमदार नारायण आबा पाटील हे करमाळा तालुक्यातील पाणी टंचाई निवारण करण्यासाठी व पूर्व भागाला पाणी देण्यासाठी समर्थ आहेत, विरोधकांनी उगीचच लुडबुड करू नये’ असा सुचक इशारा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिला आहे
पाणीटंचाई वरून तळेकर यांनी बागल गटावर या आगोदर देखील अप्रत्यक्ष टिका केली होती. काल आढावा बैठकीत बागल यांनी दहिगाव योजनेवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर आज बागल गटावर थेट टीकास्त्र डागले आहे.
बागल गटावर केलेल्या या गंभीर आरोपाला बागल गट काय उत्तर देणार या विषयी चर्चा सुरू आहे.
