करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)
देवळाली ग्रामपंचायतीतील सन २०१२ ते २०१५ या वर्षात झालेल्या 97.38 लाखांच्या आर्थिक अपहार प्रकरणी माजी सभापती गहिनीनाथ चंद्रसेन ननवरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आणि उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. पंचायत समिती करमाळा ग्रामपंचायत विभागाने तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अंगद लटके व सरपंच प्रेमा अर्जुन जगताप यांच्याकडून प्रत्येकी 48,69,454 + 7.40% व्याज वसूल करण्याचे आदेश दि. 29/04/2026 रोजी काढले आहेत
गहिनीनाथ ननवरे यांनी या भ्रष्टाचारा संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. रक्कम वसूल करावी यासाठी त्यांनी दि. 1.5.2026 रोजी जिल्हा परिषद सोलापूर येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्याचीच दखल घेत गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी अपहार रक्कम वसूल करण्याचा आदेश काढून ननवरे यांना ‘उपोषणापासून परावृत्त व्हावे व प्रशासनास सहकार्य करावे’ असे कळवले आहे.
ननवरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्या नंतर करमाळा तालुक्यातील देवळाली ग्रामपंचायतीतील आर्थिक अपहार प्रकरणात प्रशासनाने कडक भूमिका घेत संबंधितांना मोठा दणका दिला आहे. पंचायत समिती करमाळा ग्रामपंचायत विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, सन 2012 ते 2015 या कालावधीत झालेल्या आर्थिक अनियमितते प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून रक्कम वसूल करण्याचे निर्देश दिल्याने खळबळ उडाली आहे.
सदर रक्कम 7 दिवसांच्या आत ग्रामपंचायत देवाळालीच्या ग्रामनिधी खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच रक्कम जमा केल्याचा अहवाल तात्काळ वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी संबंधितांना पूर्वीही नोटिसा व आदेश देण्यात आले होते तरी देखील अंमलबजावणी न झाल्याने आता प्रशासनाने कठोर पावले उचलत अंतिम इशारा दिला आहे. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे.
हा सत्याचा विजय! अनेक वर्ष सातत्याने निवेदने,पत्रव्यवहार व आंदोलन करून हा अपहार उघड केला आहे. अपहाराची रक्कम ग्रामपंचायत च्या खात्यावर जमा झाल्यानंतर गावाच्या विकासासाठी त्याचा उपयोग होईल. हा सत्याचा विजय असून नागरिकांच्या हक्काची रक्कम वसूल होत आहे याचा आनंद आहे.–(गहिनीनाथ ननवरे माजी सभापती करमाळा)
न्याय प्रविष्ट बाब असून न्यायालयावर आमाचा विश्वास.सदर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूर खंडपीठात आम्हाला अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. सदरचे प्रकरण आता न्याय प्रविष्ट असून आमचा न्याय पालीकेवर विश्वास आहे.सदरच्या नोटीसा राजकीय दबावातुन येत आहेत न्यायालय जो आदेश देईल तो आम्हाला मान्य राहिल- सौ प्रेमा अर्जुन जगताप (माजी सरपंच देवळाली)
या संपूर्ण प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून तालुक्यातील ग्रामपंचायत कारभारातील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
