करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)
करमाळा तालुक्यातील पाणी टंचाई चा आढावा घेण्यासाठी आमदार नारायण पाटील यांनी मागील आठवडय़ात जेऊर येथे सर्व विभागाच्या आधिकर्यांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना पाणी प्रश्नी सतर्क रहाण्याच्या सुचना दिल्या आहेत. तर आज दुसरीकडे दिग्विजय बागल यांनी देखील पंचायत समितीच्या सर्व सदस्यांसह सभापती उपसभापती यांची आपल्या निवासस्थानी बैठक घेऊन तालुक्यातील पाणी प्रश्नावर गांभीर्यपूर्वक विचार करून प्रत्येक ग्रामपंचायत च्या ग्रामसेवक यांच्याशी समन्वय ठेवून आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे या बैठकीस संजयमामा शिंदे समर्थक सर्व सदस्य जिल्हापरिषद सदस्य उपस्थित असल्याने पंचायत समितीवर आपला होल्ड असल्याचे दाखवत शिंदे -बागल युती भक्कम असल्याचे देखील विरोधकांना दाखवून दिले आहे.
जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणूकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर बागल सध्या फॉर्मात आल्याचे दिसत असून कार्यकर्ते देखील चांगलेच अॅक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे.बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी पंचायत समिती कार्यालयात दर शुक्रवारी जनता दरबाराचे आयोजन करून पुढची दिशा स्पष्ट केली आहे.
विधान सभेचे घोडे मैदान अजून तिन वर्ष लांब असले तरी विधानसभेचा मार्ग हा पंचायत समितीतुनच जातो .पंचायत समितीवर ज्यांची सत्ता असते त्यांना विधान सभा निवडणूकीत मोठा फायदा होतो असे चित्र आजपर्यंत तालुक्यात बघायला मिळाले आहे. बागल गटाला पंचायत समितीच्या सत्तेचा मोठा अनुभव पाठीशी आहे.
त्यामुळेच पंचायत समितीच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात आमदारांच्या तोडीस तोड समांतर सत्ता केंद्र चालवून दिग्विजय बागल हे २०२९ ची तयारी करत असल्याची राजकीय जाणकारात चर्चा आहे.
तालुक्यातील पाणी प्रश्नावर आमदारांसह पंचायत समिती देखील सतर्क असल्याचे दिसत असून तालुक्यात पाणीटंचाई भासणार नाही यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी जनतेतून होत आहे.

