करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)
केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या धोरणाअंतर्गत करमाळा तालुक्यात स्थापन झालेल्या ‘राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी’ची वाटचाल प्रेरणादायी असून ‘सह्याद्रीच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात काम करणारी सशक्त कंपनी’ म्हणून भविष्यात पुढे येईल, असा आशावाद जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले व्यक्त केला. राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या विस्तारित नवीन युनिटच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर तहसीलदार शिल्पा ठोकडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, डिडिएम नितीन शेळके, वॉटरशेड ट्रस्टचे कांतीलाल गीते, जि.प. सदस्य गणेश चिवटे, पं.स. सभापती पूजाताई ढेरे, पं.स. सदस्य उद्योजक भरतभाऊ अवताडे, पत्रकार विवेक येवले, सुजिततात्या बागल ,अजय कुमार बागल, डॉ. अमोल गोफणे, लता तिटके, शोभा अंधळकर, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना शुक्राचार्य भोसले म्हणाले, “महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग शेतकऱ्यांसोबत आहेच. रोजगार हमी, ठिबक अनुदान, फळबाग अनुदान, अवजार बँक योजनांच्या माध्यमातून सरकार सोबत असेल. जिथे सरकार मदतीला नसेल तिथे शेतकरी कंपन्यांनी NGOच्या मदतीने काम करणे ही काळाची गरज आहे. जुन्या सहकाराचे बदललेले रूप म्हणजे शेतकरी प्रोड्युसर कंपन्या आहेत आहे. येणारा काळ या कंपन्यांचा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रोड्युसर कंपन्याचे सभासद होणे गरजेचे आहे,असे ते म्हणाले.
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे कांतीलाल गीते म्हणाले, “शासन अनुदान तसेच वॉटर, वॉलमार्ट यांच्या सहकार्याने मिळालेल्या निधीचा योग्य उपयोग राजे रावरंभा कंपनीने केल्यामुळे कंपनी योग्य दिशेने वाटचाल करत आहे.”
कार्यक्रमात डिडिएम नितीन शेळके, तहसीलदार शिल्पा ठोकडे, पं.स. सभापती पूजा ढेरे यांनी तसेच जय किसान, आर्या शक्ती कंपनीच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कंपनी अध्यक्ष डॉ. विकास वीर, सूत्रसंचालन अरुण चौगुले, आभार प्रा. बिभीषण मस्कर यांनी मानले.
कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळणार या सुविधा
बेंद फाटा येथे सुरू झालेल्या राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीकडून शेतकऱ्यांना खालील सुविधा मिळणार असून या मध्ये ऍग्रो मॉल, टिशू कल्चर केळी व डाळिंब रोपे, ठिबक, पीव्हीसी पाईप, रासायनिक खते व औषधे,जैविक निविष्ठा – निर्मिती, विक्री व मार्गदर्शन ,विषमुक्त धान्य खरेदी विक्री, कोल्ड स्टोरेज, 60 टन क्षमतेचा वजन काटा, गांडूळ बेड युनिट, 10 ड्रम युनिट, फवारणी ड्रोन, पावर टेलर, विडर, ग्रास कटर ,एचटीपी पंप, वेदर स्टेशन, अंकुश पाटील तंत्रज्ञान औषधे यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमास पुर्वभागातील शेकडे शेतकरी सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महिला शेतकऱ्यांची उपस्थितीत लक्षणीय होती.
