April 10, 2026
IMG-20260409-WA0053

करमाळा-चौफेर (शंभू फरतडे ✍️)

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी लागणाऱ्या जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला यांसारख्या शासकीय दाखल्यांसाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. ही गैरसोय टाळण्यासाठी एप्रिल व मे महिन्यातच प्रत्येक विद्यालयात विशेष कॅम्प आयोजित करावेत, अशी लोकाभिमुख मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी केली आहे.

यासंदर्भात चिवटे यांनी माढा विभागाच्या उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांना निवेदन दिले. दरवर्षी जूनमध्ये शाळा सुरू होताना दाखल्यांसाठी पालकांची धावपळ होते. वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. त्याऐवजी शिक्षकांच्या मदतीने विद्यालयातच कागदपत्रे गोळा करून त्याच ठिकाणी दाखले दिल्यास विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मोठा त्रास वाचेल, असे चिवटे यांनी सांगितले.

“शासनाच्या सुविधा गावपातळीवर पोहोचणे ही काळाची गरज आहे. छोट्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार जावे लागते, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते,” असे मत गणेश चिवटे यांनी व्यक्त केले.

या मागणीला उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *