April 6, 2026
IMG-20260406-WA0039

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)

करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा मुद्दा आता राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. आमदार नारायण आबा पाटील यांच्या गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी ही योजना सक्षमपणे सुरू असल्याचा दावा केला होता. मात्र, या दाव्याला माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे कट्टर समर्थक व अर्जुननगरचे माजी सरपंच प्रकाश थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आमदार पाटलांनी आधी उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याचा स्वतंत्र हिशोब जनतेला द्यावा आणि मगच स्वतःचे कौतुक करून घ्यावे,” असे आव्हान थोरात यांनी दिले आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सिंचनाच्या प्रश्नावरून दोन्ही गटांत खडाजंगी सुरू झाली आहे.

याविषयी अधिक बोलताना थोरात म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून अर्जुननगर गावाला पाणी मिळालेले नाही. आमच्या गावाला दहीगावच्या उजवी चारी क्र.१ वरून शेलगाव मार्गे पाणी येते. गेल्या वर्षी शेलगाव हद्दीतील बंधारे भरून अर्जुन नगर हद्दीमध्ये प्रवेश केला की पाणी बंद झालेले होते, किमान गेल्यावर्षी आमच्या गावाच्या हद्दीत पाण्याने प्रवेश तरी केलेला होता, परंतु यावर्षी मात्र वारंवार दहीगाव कार्यालयाकडे पाण्याची मागणी केलेली असूनही अद्यापही पाणी आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही. 

यापूर्वीच्या खरीप, रब्बी हंगामाचे पाणी मिळालेले नाही उन्हाळी आवर्तनाचे पाणी मिळणे तर खूप मोठे कठीण दिसत आहे.असे असताना पाटील गटाचे प्रवक्ते मात्र हवेत वार करत ९० दिवस योजना चालली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत हा प्रकार त्यांनी थांबवावा आणि उन्हाळ्यातील पाणी आवर्तनाचा हिशोब त्यांनी द्यावा असा हल्लाबोल श्री थोरात यांनी केला.

“धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांची सध्या परिस्थिती झालेली असून आमदार पाटील गटाचे प्रवक्ते मात्र प्रत्येक वर्षी त्या वर्षातील सर्वोत्तम विनोद करण्यामध्ये व्यस्त आहेत. गेल्या वर्षी त्यांनी दहिगावच्या इतिहासात सर्वप्रथम सर्व दहाच्या दहा पंप सुरू… शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण अशी भंपकबाजी केलेली होती. प्रत्यक्षात योजना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद पडली. अनेक गावे पाण्यापासून वंचित राहिली. हा इतिहास ताजा असतानाच चालू वर्षीही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सध्या सुरू आहे.

९० दिवसांपासून दहिगाव योजनेचे आवर्तन सुरू असा इतिहास सांगत स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न पाटील गटाचे प्रवक्ते करत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की,जानेवारीला योजना ज्यावेळेस सुरू झालेली होती त्यावेळेस अनेक गावांचे तलाव, ओडे, नाले यामध्ये पाणी होते. शेतकऱ्यांना जास्त पाण्याची आवश्यकता नव्हती.

उजनी धरण ही शंभर टक्के भरलेले होते. असे असताना त्या गावाच्या पाण्यात पाणी सोडून त्या गावाला पाणी दिले अशी दप्तरी नोंद केली गेली. परिणामी मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या आवर्तनामध्ये ही गावी वंचित राहत आहेत.असे थोरात म्हणाले आहेत.

पाटील गटाकडून ९० दिवस दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू होते व आवर्तन सुरू असतना आलेल्या तांत्रिक अडचणी सांगीतल्या होत्य मात्र ९० दिवसांत हि योजना व्यवस्थीत चालली नसून उलट गरज नसताना पावसाळ्यात पाणी वाया गेले असा गंभीर आरोप करून हिशोबाची मागणी केल्याने आत्ता पाटील गटाकडून काय प्रतिक्रिया समोर येते या कडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *