करमाळा_चौफेर जेऊर प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. सीना नदीला आलेल्या पुरामुळे उभी पिके, माती आणि जनावरे वाहून गेली, तर उजनी काठच्या केळी व फळबागांचे मोठे नुकसान झाले. शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले, मंत्र्यांनी पाहणी केली, मात्र अद्यापही हजारो शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. शेतकरी तहसील कचेरीचे हेलपाटे मारत असून त्यांचे समाधान होत नाहीये.

या पार्श्वभूमीवर, बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष व आदिनाथ कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसांत अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे न मिळाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी योगेश कोंडलकर, दादा करे, विलास बोराडे, बदर, भाऊ सरडे आदी शेतकरी उपस्थित होते.

राजाभाऊ कदम यांच्या मागण्या 👇
● प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीवर पात्र लाभार्थ्यांची नावे व मंजूर रक्कमेची यादी प्रसिद्ध करावी.
● तहसील कार्यालयात चौकशीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांशी कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे बोलू नये.
● प्रलंबित असलेली मदतीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.


यापूर्वी युवासेनेच्या वतीने या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वारंवार ‘घंटानाद’ आणि ‘शंखनाद’ आंदोलने करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे .आंदोलनानंतर काही प्रमाणात शेतकऱ्यांना निधी वाटप केला गेला मात्र त्यानंतर सरकार कडूनच पैसे आले नसल्याचे सांगून बोळवन केली जाते. आजही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने संताप व्यक्त होत आहे. “शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. भविष्यातही या लढ्यात युवासेना अधिक ताकदीने उतरेल,” असा इशारा शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे.



