करमाळा चौफेर (शंभू फरतडे✍🏻 )
पावसा अभावी खरीप हंगामाची पिके जळाली असून तातडीने मदत जाहीर करा या मागणी साठी रासप व भाजप पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की,ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने दडी मारल्याने करमाळा तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. उडीद, तूर, मूग, बाजरीसह विविध खरीप पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, रासपचे अंगद देवकते ,व भाजपचे नितीन झिंजाडे यांच्या नेतृत्वाखाली पोथरे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली होती. मात्र त्यानंतर पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्याने अनेक भागांतील पिके सुकून करपली आहेत. पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी मवा आणि करपा रोगाचा प्रादुर्भावही झाला आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे.
उपलब्ध पाण्यातून पाणी देण्याचा प्रयत्न केला तरी जलस्रोतांची पाणीपातळी खोल गेल्याने ते शक्य झाले नाही. काही शेतकऱ्यांवर उभी पिके मोडून टाकण्याची वेळ आली आहे. पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर मोठा खर्च झाला आहे. मात्र उत्पादन हातातून गेल्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज आणि उसनवारी फेडणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन नुकसानग्रस्त खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करावेत,पंचनाम्यात नुकसानीची योग्य नोंद करून पात्र शेतकऱ्यांना शासन नियमानुसार नुकसानभरपाई व आर्थिक मदत मिळावी,शेतकऱ्यांना पीकविमा व शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळवून द्यावा.या महत्वपूर्ण मागण्या देखील निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचे लेखी निवेदन पोथरे येथील शेतकऱ्यांनी तहसीलचे नायब तहसीलदार विजय लोकरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री, कृषीमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले.
●निवेदनावर स्वाक्षरी केलेले शेतकरी व नागरिक●
पोथरे ग्रामपंचायत सदस्य रघुवीर जाधव, माजी सरपंच हरिश्चंद्र झिंजाडे , भाजपचे सोशल मीडिया तालुका अध्यक्ष नितीन झिंजाडे , राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, संदीप नंदरगे , संतोष साळुंखे, दयानंद रोही , दिगंबर झिंजाडे , नाना शिंदे , बापूराव गोसावी, दत्तात्रय आढाव, सुभाष शिंदे , नामदेव शिंदे, दत्ता हिरडे, संजय शिंदे बाळासाहेब खराडे , पत्रकार हरिभाऊ हिरडे , विवेक कुलकर्णी , ऋषीकेश रणवरे , महादेव शिंदे , शांतीलाल जाधव , सागर झिंजाडे आदींसह पोथरे ग्रामस्थ उपस्थित होते.
