करमाळा-चौफेर
पंचायत समिती करमाळा कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदीसाठी ५० टक्के किंवा मर्यादित अनुदान उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप नेते दिग्विजय बागल यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत कडबाकुट्टी, ५ एचपी व ७.५ एचपी विद्युत ओपनवेल सबमर्सिबल पंप संच (पाणबुडी मोटार), ५/६ एचपी डिझेल इंजिन, रोटाव्हेटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, पिस्टन स्प्रे पंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, ताडपत्री आणि स्लरी फिल्टर या कृषी साहित्यांसाठी अनुदानाचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले परिपूर्ण प्रस्ताव २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पंचायत समिती, करमाळा येथील आवक-जावक विभागात सादर करावेत. अपूर्ण प्रस्ताव स्वीकारले जाणार नसल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनच प्रस्ताव दाखल करावेत.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, उत्पादन खर्च कमी व्हावा आणि शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ मिळावा, या उद्देशाने अशा योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिग्विजय बागल यांनी केले आहे
_____________________________________________

एआय आधारित कृषी किटचाही अनुदान योजनेत समावेश करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे मागणी करणार – दिग्विजय बागल
“शेतकऱ्यांना पारंपरिक कृषी साहित्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत एआय आधारित कृषी किटचाही समावेश करून ते अनुदानावर उपलब्ध करून द्यावेत, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी करणार आहे. स्मार्ट सेन्सर, स्वयंचलित सिंचन प्रणाली आणि एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाणी, खते व उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ अल्पभूधारक आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही मिळावा, हा यामागील उद्देश आहे.”
दिग्विजय बागल, भाजप नेते
