करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍ )
उजनी जलाशय काठावरील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या वीज कपातीविरोधात पेटलेल्या ‘उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती’च्या आक्रमक आंदोलनापुढे अखेर प्रशासनाला झुकावे लागले आहे. जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुचित्रा डुंबरे यांनी आंदोलकांच्या मागण्या मान्य करून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर व सहकाऱ्यांनी आपले नियोजित आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
धरणात 43.11% म्हणजे 23.10 TMC उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना केवळ 2 तास वीज देण्याच्या धोरणाविरोधात समितीने 9 जुलैची डेडलाईन दिली होती. मुदत संपताच करमाळा तालुक्यातील शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी भिमानगर येथील उजनी धरण व्यवस्थापन कार्यालयाला घेराव घातला.
परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात येताच उप-कार्यकारी अभियंता ना. बी. खडतरे यांनी वरिष्ठांना पाठवलेल्या पत्राचा दाखला देत कार्यकारी अभियंता सुचित्रा डुंबरे यांनी स्वतः मध्यस्थी केली व लेखी आश्वासन दिले.
●लेखी आश्वासनात काय?●
बिगर सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे आरक्षण सुरक्षित ठेवून धरणातील एकूण पाणीपातळी आता 86.76 TMC वर समाधानकारक झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी रास्त असल्याचे प्रशासनाने मान्य केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या आदेशात सुधारणा करून महावितरणमार्फत शेतीपंपांचा वीज पुरवठा दररोज 2 तासांवरून वाढवून पूर्ववत 8 ते 10 तास सुरळीत करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून तात्काळ आदेश काढले जातील, असे लेखी आश्वासन सुचित्रा डुंबरे यांनी दिले.
●”एकजुटीचा विजय, पण गाफील राहणार नाही” – बंडगर●
उपोषण स्थगितीची घोषणा करताना प्रा. शिवाजीराव बंडगर म्हणाले, “हा उजनीसाठी त्याग करणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि आवाजाचा विजय आहे. कार्यकारी अभियंता डुंबरे यांनी दिलेल्या लेखी शब्दाचा मान राखून आम्ही तूर्तास उपोषण स्थगित करत आहोत. मात्र, जर महावितरणने पुढील 48 तासांत वीज पुरवठा पूर्ववत केला नाही, तर शेतकरी पुन्हा एकही पूर्वसूचना न देता भीमानगर कार्यालयाला टाळे ठोकतील. प्रशासनाने आम्हाला गाफील समजू नये.”
●शेतकऱ्यांमध्ये जल्लोष●
प्रशासनाने लेखी पत्र सुपूर्द करताच उपस्थित शेतकऱ्यांनी जल्लोष केला. यावेळी धरणग्रस्त संघर्ष समितीचे उपाध्यक्ष भारत साळुंखे, आदिनाथचे व्हाईस चेअरमन महेंद्र पाटील, नवनाथ शिंदे, विजय नवले, रंगनाथ शिंदे, अखलाक जहागीरदार, संपत सरडे, दिलावर मुलानी आदी उपस्थित होते.
