करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍🏻..)
रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सर्वेक्षणासाठी निधी वितरित करण्याचे आदेश देण्यात आले. या वेळी मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजपा जिल्हा सरचिटणीस व जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी गणेश चिवटे उपस्थित होते,या बैठकीत सर्वेक्षणासाठीच्या निधीस मंजुरी मिळताच दोन्ही बाजूंनी यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यामुळे रिटेवाडी योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू असल्याचे समोर आले आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत योजनेच्या सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. आमदार नारायण आबा पाटील यांनी योजनेचा समावेश सध्या चतुर्थ सुप्रमा मध्ये असल्याने त्यासाठी अधिक काळ वाट पाहावी लागेल, ही बाब मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली, सर्वेक्षण कामाचा समावेश तृतीय सुप्रमा मध्ये करून तातडीने 50 लाख रुपये निधी मंजूर करावा, अशी मागणी केली. यावर जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना पडताळणीचे आदेश दिले असून सर्वेक्षणासाठी निधी देणार असल्याचे सांगितले. यामुळे आता योजनेच्या अंमलबजावणीकडे महत्त्वाचे पाऊल पडले आहे.असे पाटील गटाकडून सांगण्यात आले.
रिटेवाडी माझा संकल्प आबांचा दावा–
बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले, “रिटेवाडी उपसा सिंचन योजना हा माझा संकल्प आहे. या कामाचा पाठपुरावा मी अविरतपणे चालू ठेवला आहे. या योजनेमुळे करमाळा तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे 65 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आता निधीची तरतूद झाल्याने या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल.”
●नाईक निंबाळकर-चिवटे म्हणाले – “आमच्या पाठपुराव्याला यश”●
रिटेवाडी योजनेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांनाही या बैठकीत सकारात्मक दिशा मिळाली असे चिवटे म्हणाले . याबत माहिती देताना भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले, “रिटेवाडी उपसा सिंचन योजना करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मंत्री महोदयांनी सर्वेक्षणाचे आदेश दिल्याने ही योजना मार्गी लागण्याबत मोठी आशा निर्माण झाली आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील मंजुरीची प्रक्रिया गतीने पार पडेल.”
आमदार पाटील यांनी मंत्रालयात थेट बैठक घेऊन निधीची मागणी केली यावेळेस माजी खासदार नाईक निंबाळकर-व चिवटे देखील उपस्थितीत होते.मात्र दोघांकडून देखील स्वतंत्र बातम्या देऊन आम्ही पाठपुरवा केला असल्याचे सांगतीले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच आज हा निर्णय झाला असल्याचा दावा चिवटे यांनी केला आहे. त्यामुळे रिटेवाडीच्या श्रेयावरून दोन्ही गटांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
जलसंपदा मंत्र्यांच्या सर्वेक्षण आदेशांमुळे रिटेवाडी उपसा सिंचन ही महत्त्वाकांक्षी योजना लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आहे.मात्र सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध झाल्यावर ऐवढा श्रेयवाद असेल तर प्रत्यक्षात योजना मंजूर झाल्यानंतर काय परस्थीती असेल याची देखील खुमासदार चर्चा सुरू आहे.
या आगोदर माजी आमदार संजयमामा शिंदे व आमदार नारायण आबा पाटील यांच्यात रिटेवाडी सर्वेक्षण निधी वरून असाचा श्रेयवाद रंगला होता..
