करमाळा_चौफेर
आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावरच चालवावा या प्रमुख मागणीसाठी वांगी येथील उदयसिंह देशमुख यांनी मंगळवार, दि. 7 जुलै पासून श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गेटसमोर उपोषण सुरू केले आहे.
आदिनाथ कारखाना हा 33 हजार सभासद शेतकरी आणि कामगारांच्या मालकी हक्काचा आहे. सत्ताधारी संचालक मंडळाने कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्याही सभासद शेतकरी, ऊस उत्पादक व वाहतूकदारांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
कारखाना सहकारी तत्त्वावर चालवू, असे आश्वासन देऊनच सभासदांनी संचालक मंडळाच्या ताब्यात दिला होता. त्याच मंडळाने आता तो भाड्याने देणे म्हणजे सभासदांच्या विश्वासघात असल्याचे उदयसिंह देशमुख म्हणाले. या बाबत त्यांनी सहकार मंत्र्यांकडे मागणी केली आहे की, सभासदांचा विचार करून हा कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहिला पाहिजे. जर सत्ताधारी संचालक मंडळाला कारखाना चालवता येत नसेल तर महाराष्ट्र सरकारने शासकीय अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी आणि त्यांच्यामार्फत कारखाना सुरू करावा.
सत्ताधारी संचालक मंडळाचा हा कारखाना खाजगी व्यक्तीच्या घशात घालण्याचा डाव आहे आणि तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे 
