July 7, 2026
IMG-20260707-WA0024

करमाळा_चौफेर 

 करमाळा शहरावर सध्या ऐतिहासिक पाणीटंचाईचे संकट आहे. इतिहासात नोंद करावी इतकी वाईट परिस्थिती करमाळेकरांवर आली असून, तब्बल ८-८ दिवस पाणी येत नाही ,आले तरी ते पूर्ण दाबाने मिळत नाही. यासाठी सत्ताधारी सपशेल अपयशी ठरल्याची सडेतोड टीका माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ यांनी केली आहे.ओहोळ म्हणाले, “करमाळ्याला पहिल्यांदा १९६७ साली स्व . नामदेवराव जगताप यांनी सीना नदीवरून पाणीपुरवठा योजना दिली. त्यानंतर १९९३ मध्ये जयवंतराव जगताप यांनी आमदार असताना खास बाब म्हणून उजनी धरणावरून पाणी योजना मंजूर केली. तेव्हापासून शहराला सुरळीत पाणी मिळत होते.”शहराची लोकसंख्या आणि विस्तार वाढल्यानंतर जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार, मी आणि अमोदशेठ संचेती नगराध्यक्ष असताना विस्तारित पाणीपुरवठा योजना राबवली. चारही दिशेला पाण्याच्या टाक्या उभ्या करून सर्व प्रभागांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू केला होता मात्र २०२१ मध्ये नगरपालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासकाच्या काळात शहराचे कामकाज विस्कळीत झाले. रस्ते आणि पाणीपुरवठ्याची दुरावस्था सुरू झाली,” असे ओहोळ म्हणाले.निवडणूक होऊन सत्तांतर झाले असले तरी गेल्या सात महिन्यांत कोणताही बदल दिसला नाही उलट सर्वत्र धुळीचे साम्राज्य, रस्त्यांची दुरावस्था आणि पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा प्रशासनावर आणि पदाधिकाऱ्यांवर प्रचंड वचक होता. त्यामुळे शहर विकासात कधीही हलगर्जीपणा झाला नाही. आज सत्तेत असले बहुतांश लोक त्यांच्याच नेतृत्वाखालील सत्तेचे लाभार्थी होते, याचा विसर सत्ताधाऱ्यांनी पडू देऊ नये, असे ओहोळ यांनी ठणकावून सांगितले.सध्या करमाळावासीयांना ८-८ दिवसांनी आणि तेही कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.असे देखील ओहोळ यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *