May 25, 2026
IMG-20260525-WA0041

               ●करमाळा_चौफेर●

सावंत गटाचा लेखाजोखा (शंभू फरतडे✍🏻)

करमाळा शहरातील केवळ एका प्रभागापुरते मर्यादित असलेल्या सावंत गटाने मुत्सद्दी राजकारणाच्या जोरावर करमाळा नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवत ऐतिहासिक विजय नोंदवला . या विजयाने जगताप गटाच्या अनेक वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला, संजय सावंत यांच्या पत्नी सौ मोहिनी सावंत थेट नगराध्यक्ष पदी विजयी झाल्या. सावंतांच्या या विजयाने करमाळ्याच्या राजकारणात आता नवे समीकरण तयार झाले आहे.  सावंत गटाचे उमेदवार विक्रमसिंग परदेशी यांनी विद्यमान नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा पराभव केला. हा प्रभाग जगताप गटाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात होता,सुनील सावंत यांच्या पत्नी सौ चैताली सुनील सावंत यांनी  स्वतःचा पारंपरिक वार्ड सोडून मुस्लिम व दलित बहुल वार्डातून निवडणूक लढवली. तेथे त्यांनी आल्ताफ तांबोळी यांच्या पत्नीचा पराभव करत विजय मिळवला. या दोन विजयांनी शहरात सावंत गटाची लाट असल्याचे सिद्ध केले. व सावंत यांची राजकीय रणनीती किती अचूक होती हे सिद्ध झाले. २०११ साली संजय सावंत नगरसेवक म्हणून विजयी झाले. त्यानंतर २०१७ साली नागरिक संघटनेबरोबर युती करून संजय सावंत यांच्यासह सावंत गटाचे तिन नगरसेवक निवडून आले. तेव्हापासूनच नगरपालिकेतील सत्तेचा पाया भक्कम होण्यास सुरुवात झाली होती.●राजकीय वारसा आणि वाटचाल : एकोप्याचे बळ●

१९६२\६७ च्या सुमारास सुभाष आण्णा सावंत यांचे चुलते कै. डी.के. सावंत माजी आमदार स्व. आण्णासाहेब जगताप यांचे निकटचे सहकारी होते. त्यांनी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवले होते तिथुनच सावंताच्या राजकीय प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. शेती व बैल व्यापार हा मुख्य व्यवसाय सांभाळणारे सावंत कुटुंब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले. स्व. अनंतराव आबा सावंत यांची मुले सुभाष अण्णा, गोपाळ बापू, भगवान नाना, दादासाहेब आणि विठ्ठलआप्पा या पाचही भावांमध्ये कमालीचा एकोपा होता. कुठेही अन्याय झाला तर लोक हक्काने सावंत वाड्यावर यायचे आणि जागेवर न्यायनिवाडा व्हायचा हो आजही होत आहे.

स्व सुभाष (आण्णा) सावंत व विठ्ठल आप्पा सावंत यांनी व्यापाराच्या निमित्ताने पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांशी थेट नाते जोडले. याच भक्कम जनसंपर्काचा फायदा पुढे कुटुंबाला राजकारणात झाला. आजही ग्रामीण भागात ‘सावंत’ म्हटलं की लोक आपुलकीने बघतात, यामागे या जुन्या पिढीचे कष्ट आहेत.

●सुभाष अण्णा सावंत यांचे योगदान●

सुभाष आण्णा यांचे वडील स्व. अनंतराव (आबा ) स्वतः बाजार समितीमध्ये हमाली करत होते.लहानपना पासून आण्णांनी हमालांच्या व्यथा जवळून पाहिल्या होत्या. हमालांना न्याय मिळावा, त्यांना त्यांच्या हक्काचा दाम मिळावा या उद्देशातून  सुभाष अण्णा सावंत यांनी १९८१ साली कामगार नेते डाॅ बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ‘हमाल पंचायत’ ची स्थापना केली. संस्थापक अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला, १९९७ साली त्यांनी साडे जिल्हा परिषद गटातून जगताप गटाच्या पॅनलमधून निवडणूक लढवली व विजयी झाले. त्यानंतर आदिनाथ कारखान्यावर तज्ञ संचालक म्हणून, तर नंतर बागल गटाकडून संचालक मंडळावरही विजय मिळवला,याच दरम्यान सुभाष अण्णा संचालक असतानाच त्यांचे बंधू दादासाहेब सावंत हे करमाळा नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले व त्यांनी उपनगराध्यक्षपद यशस्वीपणे भूषवले. त्यामुळे सावंत कुटुंबाची ताकद कारखाना आणि नगरपालिका अशा दोन्ही ठिकाणी एकाच वेळी होती.स्व. सुभाष अण्णा सावंत यांच्या निधनानंतर ॲड. राहुल सावंत, संजय उर्फ पप्पू सावंत आणि सुनील बापू सावंत या तिघांनी एक दिलाने व एक विचाराने गटाची धुरा सांभाळली. कुटुंबातील एकोपा, सर्व जाती-धर्माच्या लोकांशी असलेला सलोखा आणि पारदर्शक न्यायनिवाडा यामुळे त्यांनी शहरवासीयांची मने जिंकली. २०१७ साली स्व. सुभाष अण्णा यांचे चिरंजीव ॲड. राहुल सावंत यांनी पांडे पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. नाट्यमय घडामोडींनंतर त्यांना आमदार नारायण पाटील यांचा पाठिंबा मिळाला व ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.या निवडणुकीत नारायण पाटील जयवंतराव जगताप यांची युती होती.नगरपालिकेवरील वर्चस्वानंतर सावंत गट आता संपूर्ण तालुक्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत . ॲड राहुल सावंत यांच्या पत्नी सौ. ज्योती राहुल सावंत यांनी भाजपच्या रश्मीदिदी बागल यांना कडवी झुंज दिली. पराभव झाला तरी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली व २७ पैकी १२ गावात क्रमांक एक ची मते मिळवली, सध्याची राजकीय स्थिती अशी आहे की, तालुक्यातील कोणतीही निवडणूक जिंकायची असेल तर सर्वच गटांना सावंत गटाची मदत घ्यावी लागणार आहे. संघर्ष, लोकांचा विश्वास आणि जनसेवा याची सांगड घातल्यास सावंत गटाचा तालुक्याच्या राजकारणात दबदबा कायम रहाणार आहे. सावंत गटापुढील आव्हाने

१. पुरोगामी ओळख टिकवण्याचे आव्हान:

सावंत गट हा नेहमीच पुरोगामी विचारसरणीचे राजकारण करणारा गट म्हणून ओळखला जातो. मुस्लिम, दलित व ओबीसी मतदारांनी भाजप व शिंदे सेनेला डावलून सावंत गटाच्या अपक्ष उमेदवारांना विजयी केले आहे. पक्ष बदलताना या मतदारांचा विश्वास कायम राखणे हे सर्वात मोठे आव्हान असेल.

२. विकास निधीची जुळवाजुळव●

शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सत्ताधारी शिंदे सेना किंवा भाजप यांच्याशी विचारपूर्वक राजकीय समीकरण जुळवावे लागणार आहे, विजयाच्या जल्लोषातून बाहेर पडून आता कामाला लागणे गरजेचे आहे. प्रचार काळात सत्ताधाऱ्यांच्या ज्या चुकांवर बोट ठेवले, त्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे आणि दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही खरी कसोटी असणार आहे. केवळ प्रभागापुरते वर्चस्व असलेल्या गटाने नियोजनबद्ध राजकारण आणि कुटुंबातील पिढ्यानपिढ्याच्या एकोप्याच्या बळावर थेट नगरपालिकेची सत्ता काबीज करण्याचा हा करमाळ्यातील पहिलाच प्रयोग ठरला आहे. आता विकासाचा पॅटर्न राबवून जनतेचा विश्वास संपादन केला, तरच हे वर्चस्व दीर्घकाळ तालुक्यात टिकू शकेल

●प्राधान्यक्रमाने करावयाची कामे●

१. जीन मैदान परिसरातील स्वच्छता

२. पुणे-करमाळा रस्त्यावरील धुळीचा प्रश्न

३. संगम चौक ते भवानी नाका रस्ता दुरुस्ती

४. शहराला नियमित व शुद्ध पाणीपुरवठा

५. सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था सुधारणे,

६. नाना नानी पार्क, बालोद्यान, सांस्कृतिक भवन याचा कायापालट करणे,

७. नगरपालिकेची सुसज्ज इमारत करणे

८. सर्व महापुरुषांचे पुतळे व सुशोभीकरण

९. पालिकेच्या आरोग्य केंद्र सुसज्ज करून मोफत आरोग्य सेवा मिळवून देणे.

_____________________________________________

– टीप:- पुढील सदरात-मोहिते-पाटील गटाचा लेखाजोखा व सद्यस्थिती मांडणार आहोत- वाचत रहा करमाळा_चौफेर न्युज पोर्टल 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *